फिनलेच्या कामगारांची भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे धाव

अमरावती : केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली असलेली अचलपूरची फिनले मिल गेल्या चार वर्षापासून बंद आहे. ती सुरू करण्याकरिता व पूर्णपणे बंद पडण्यापासून वाचविण्याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने शक्य ते प्रयत्न करा, मिल बंद होण्यापासून वाचवा, अशा आशयाचे निवेदन शेकडो मिल कामगारांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले.

    भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अचलपूर, दर्यापूर व मेळघाट विधानसभा मतदार संघाच्या तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्यक्ष संपर्क अभियानाकरिता परतवाडा शहरात आले असता विदर्भ मिलमधील गिरणी कामगार सभेच्या कामगारांनी त्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली व निवेदन दिले.गेल्या चार वर्षापासून 900 कामगार असलेली फिनले मिल नफ्यात असताना देखिल केंद्र सरकारने तात्पुरत्या स्वरूपात बंद केली होती.

    फिनले करिता अनेक आंदोलने करून देखील मिल सुरू होत नसल्यामुळे 900 कर्मचार्‍यांवर तसेच त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येत आहे. मिल 4 वर्षापासून बंद असल्याचा धसका घेत 13 कामगारांनी जीवनयात्रा संपवली आहे. कामगारांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून नफ्यात असलेली ही मिल बंद करण्याचा घाट सुरू असल्याने हजारो कामगारांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंद असलेली ही मिल परत सुरू करावी व कामगारांना मिळत असलेला अर्धा पगार पूर्ण मिळावा, अशा आशयाचे निवेदन मिल कामगार गिरणी कामगारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. यावेळी गिरणी कामगार सभेचे शेकडो सदस्य तसेच कामगार उपस्थित होते.