वालमेट फ्लो कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड (Valmet flow control pvt ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

वालमेट फ्लो कंट्रोलमध्ये (डोंबिवली आणि अंबरनाथ यूनिट) द्वितीय त्रैवार्षिक वेतनवाढीचा करार; कामगारांना २१ हजारांची घसघशीत वाढ

डोंबिवली : धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघ आणि वालमेट फ्लो कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड, डोंबिवली यांच्या दरम्यान कामगारांच्या वेतनवाढीचा द्वितीय त्रैवार्षिक करार नुकताच संपन्न झाला. या कराराअंतर्गत कामगारांच्या वेतनात एकूण ₹२१,००० इतकी घसघशीत वाढ करण्यात आली असून, ग्रॉस पगाराच्या आधारे १५ टक्क्यांपर्यंत बोनस देण्यास व्यवस्थापनाने मंजुरी दिली आहे. ही पगारवाढ १०५००:५२५०:५२५० या प्रमाणात देण्यात येणार आहे. 

    हा करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला असून १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या कालावधीकरिता आहे. वेतनवाढीसोबतच कामगारांच्या हिताचे तसेच विविध कल्याणकारी बाबींशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या करारामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. सेवानिवृत्ती लाभ ५००००/- देण्यात आला आहे. ५ लाखाच्या मेडिक्लेम सुविधेबरोबर १,३ आणि ५ शनिवार सुट्टी देण्याचे व्यवस्थापनाने मंजूर केले आहे. 

   दि.२३ सप्टेंबर रोजी या करारावर सही करण्यात आली असून, यावेळी कंपनीचे प्लांट डायरेक्टर कृणाल भावसार यांच्यासह व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि युनिट कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

    या करारामुळे वालमेटच्या कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि संघटित वाटचालीला या करारातून महत्त्वपूर्ण बळ मिळाले असल्याची भावना कामगारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजन राजे यांनी सर्व कामगारांचे अभिनंदन करून कंपनीच्या प्रगतीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कामगारांचे हित आणि कंपनीची प्रगती यांचा समन्वय साधत भविष्यातही सकारात्मक पद्धतीने वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.