ठाणे : वाडा येथील गाला प्रेसिजन इंजिनीअरिंग प्रा.लि. या कंपनीत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक वेतन करार संपन्न झाला आहे.
या वेतन करारापोटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कमाल 12,500 रुपयांची घसघसीत वाढ होणार आहे. त्याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देण्याचेदेखील आस्थापनाने मान्य केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे गाला प्रेसिजन इंजिनीअरिंग पंपनीत झालेल्या या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, आस्थापनाच्यावतीने सी.ओ.ओ. अवधूत पणशीकर, ए.व्ही.पी. (एच.आर.) तुकाराम बेहरे , मॅनेजर (एच.आर.) अमोल शिंदे तसेच युनिट कमिटीच्यावतीने महेंद्र भोईर, दिनेश पाटील, सचिन भोईर व गणेश पाटील यांनी स्वाक्षऱया केल्या.
वैद्यकीय सुविधा, फेस्टिव्हल, अॅडव्हान्स मिळणार
आस्थापनाच्यावतीने कर्मचाऱ्यांना विविध सुविधादेखील देण्यात येणार आहेत. वैद्यकीय सुविधेपोटी कर्मचाऱ्यांना दीड लाखापर्यंत मदत मिळेल. कर्मचारी निवृत्त होतेवेळी 58 हजार रुपये भेट स्वरुपात देण्यात येणार आहेत. याशिवाय फेस्टिव्हल अॅडव्हान्स म्हणून 7500 रुपये आणि आगाऊ वेतन 5 हजार रुपयांपर्यंत मिळेल. त्याव्यतिरिक्त यापूर्वीच्या करारात मिळत असलेल्या सुविधा आहेत तशाच सुरू ठेवण्यात आल्या आहेत.