चाकण - एमआयडीसी मधील कंपन्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कंपनी प्रतिनिधींसोबत पिंपरी चिंचवड पोलिसांची बैठक मंगळवारी (दि. 6) सावरदरी येथील ब्रिजस्टोन कंपनीत पार पडली असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.
बैठकीसाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, सहायक कामगार आयुक्त निखील वाळके, एमआयडीसीचे उपअभियंता श्री. चौडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, तसेच चाकण एमआयडीसी मधील महत्वाच्या कंपन्यांचे प्रतिनिधी मर्सिडीज कंपनीचे सारंग जोशी, ब्रिजस्टोन कंपनीचे पौरव मेहता, न्यू हॉलंड कंपनीच्या शितल साळुंखे, टाटा मेग्ना कंपनीचे शंकर साळुंखे, मिंडा कंपनी ग्रुपचे राजदाईजे, स्पोल अँटो कंपनीचे सुधीर पाटील व व्हायब्रेट एचआर प्रोफेशनल असोसिएशन पुणे व फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रिजचे प्रतिनिधी, तसेच महाळुंगे व चाकण, एमआयडीसी मधील 250 कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, माथाडी बोर्डाचे सहाय्यक कामगार आयुक्त निखील वाळके, एमआयडीसी विभागाचे उपअभियंता श्री. चौडेकर यांनी उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या अडचणी त्या तात्काळ सोडविण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.
त्यामध्ये विशेषतः औद्योगिक वृध्दीसाठी व गुंतवणुक दारांचे हित व सुरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली. कामगार युनियन, माथाडी कामगारांच्या समस्या, माथाडी कामगार कायदा, चरित्र्य पडताळणी, वाहतुक नियोजन व अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरा आदी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, 'एमआयडीसी भागामध्ये औद्योगिक वृध्दी होणेसाठी व सुरक्षिततेची भावना अधिक भक्कम करणेसाठी समन्वय बैठका नियमीत आयोजीत करण्यात येतील. तसेच कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या लोकांबाबत भय अथवा त्यांचे दबावास बळी पडू नये, औद्योगिक क्षेत्रास कसल्याही प्रकारचा त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.'
चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर शंकर साळुंखे यांनी चाकण व महाळुंगे या भागातील एमआयडीसीची माहिती करुन दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर यांनी आभार मानले.