'कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन' चर्चासत्र संपन्न

पिंपरी-चिंचवड : नव्या कामगार कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या अनुषंगाने मॅक्स महाराष्ट्रच्यावतीने पिंपरी-चिंचवड येथील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (३ जून) रोजी 'कामगारांच्या प्रश्नांवर महामंथन' या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमात राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले, कामगार कायद्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी, स्पर्धा परिक्षा विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे, मॅक्स महाराष्ट्र संपादक रवींद्र आंबेकर, मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे, कामगार नामा मुख्य समन्वयक भूषण कडेकर यांच्यासह राज्यातून आलेले विविध भागातील शेकडो कामगार चर्चासत्रात सहभागी होते.

    यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले म्हणाले कि, केंद्रातील नवीन कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करण्यासाठी मंत्रिमंडळ यांनी निर्णय घेतला आहे, हे नवीन कामगार कायदे लागू झाले तर  तर fix term employment या नवीन कायद्यामुळे 5 व 3 वर्षांकरिताच विविध कंपनी व विविध उद्योग समूहात युवकांना नोकरी मिळणार आहे, पुढे पर्मनंट कामगार पद्धत बंद होईल. कामगार कायद्याचे संरक्षण निघून गेल्यास भविष्यात देशातील युवा पिढीची प्रचंड पिळवणूक होणार तर आहेच परंतु आत्ताचे कामगार उध्वस्त होतील. 

   ज्येष्ठ विधिज्ञ अँड. नितीन कुलकर्णी म्हणाले कि, नवीन कामगार कायदे संसदेत पारित होत असताना त्यावरती संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. नवीन कामगार कायदे यांचे फायदे व दुष्परिणाम काय होऊ शकतात याबाबत संसदेत चर्चा झाली असती तर अधिक योग्य झाले असते. जुन्या कामगार कायदे यांना रंगरंगोटी करून नवीन कामगार कायदे तयार करण्यात आले असून यातील काही तरतुदी या कामगार व कामगार संघटना यांचे अस्तित्व धोक्यात आणू शकतात.

    स्पर्धा परिक्षा विद्यार्थी संघटनेचे किरण निंभोरे म्हणाले कि, सरकारी जॉब मध्ये देखील आत्ता मोठ्याप्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम येत असून खाजगी 9 एजन्सी यांना काम दिलेले आहे. त्यामुळे सरकारी जॉब मध्ये देखील युवक, युवती यांच्यासाठी कायमस्वरूपी नोकरी मिळणे अवघड होणार असून याचा दुष्परिणाम समाजामध्ये होणार आहे.

    कामगार नामा मुख्य समन्वयक भूषण कडेकर यांनी सांगितले कि, नवीन कामगार कायदे यांच्यातील  चुकीच्या तरतुदी रद्द झाल्या पाहिजे याकरिता जनआंदोलन निर्माण होणे गरजेचे असून त्याकरिता नवीन कामगार कायद्या विषयी जनजागृती होणे गरजेचे असून सर्व कामगार संघटना यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. संघटित क्षेत्रातील कामगार संघटना व कामगार यांनी असंघटित क्षेत्रातील कामगार यांना देखील बरोबर घेतले पाहिजे.

    मॅक्स महाराष्ट्र संपादक रवींद्र आंबेकर, मॅक्स वुमनच्या संपादिका प्रियदर्शनी हिंगे व संपूर्ण मॅक्स महाराष्ट्र टीम यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या चर्चासत्राचे आयोजन केले यावेळी बहुसंख्य कामगार यांनी देखील या चर्चासत्रामध्ये आपल्या भावना बोलून दाखवल्या.