चिखलीपाडा : (ता. साक्री) येथे मेणबत्ती कारखान्याला मागील हप्त्यात मंगळवारी लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात कारखाना मालकासह चार जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
विशेष म्हणजे हा कारखाना अनधिकृतरीत्या सुरू होता. तसेच या ठिकाणी काही बालकामगार देखील काम करत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली होती. कामगार उपआयुक्त विकास माळी, औद्योगिक सुरक्षा विभागचे के. टी. झोपे आदींनी घटनास्थळी पाहणीकरून संबंधितांवर खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी सांगितले.
चिखलीपाडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये स्फोटक पदार्थ वापरून मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला परवानगीच नाही, अशी माहिती पोलिस तपासात आली आहे. घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीदेखील या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मृतांच्या नातेवाइकांना दिले आहे.
मृत आशाबाई भागवत यांचे पती भय्या सुरेश भागवत यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भवानी सेलिब्रेशन वर्कशॉप हा वाढदिवसाचे सेलिब्रेशनसाठी स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना सुरेश माने (रा. धोत्री, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) व रोहिणी जगन्नाथ कुंवर (रा. वासखेडी) यांच्या मालकीचा आहे. वर्कशॉप सुपरवायझर म्हणून रोहिणी कुंवर यांचे वडील जगन्नाथ रघुनाथ कुंवर हे कामकाज पाहतात. अरविंद जाधव हा ऑपरेटर आहे. या कारखान्यात स्फोटक दारू वापरून स्पार्किंग मेणबत्ती तयार करण्याचा वर्कशॉप कोणतीही शासकीय परवानगी न घेता सुरू होता.
बालकामगार मजुरीसाठी लावले होते. तसेच मजुरांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. स्फोट झाल्यानंतर ऑपरेटर जाधव हा घटनास्थळावरून पळून गेला. घटनेतील पाच महिलांच्या मृत्यूस व जखमीस संशयित कारणीभूत झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या बाबत औद्योगिक सुरक्षा विभागाचे सह आयुक्त के. टी. झोपे व कामगार उपायुक्त माळी यांनी घटनास्थळी दाखल होत सर्व परिस्थितीची माहिती घेतली. तसेच या बाबत संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. तर सदर घटना ही प्रथमदर्शनी शॉटसर्किटमुळे झाल्याचे समोर येत असले तरी तांत्रिक यंत्रणेद्वारे तपास करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.
