उद्योग सुरु न झालेले भूखंड प्रशासन ताब्यात घेणार

उद्योजकांना उद्योग स्थापनेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने औद्योगिक वसाहतीत भुखंड उपलब्ध करून दिले जातात. या भुखंडावर विहीत कालावधीत उद्योग सुरु करणे आवश्यक आहे. परंतु वर्षानुवर्षे उद्योग सुरु न केल्याने अशा वसाहतीतील भुखंड ताब्यात घेतले जाणार आहे असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहेत.

     वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या अध्यक्षतेखील जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी भूखंड घेऊन अनेक वर्ष उद्योग सुरु न केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भुखंड ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सुप्रिया बावनकुळे, व्यवस्थापक प्रतिभा देठे, एमआयडीसीचे उपअभियंता महेंद्र पाटील, वर्धा उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, बुटीबोरी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

    महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वर्धा येथील औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरु करण्यासाठी उद्योजकांना भुखंड वितरीत करण्यात आले. परंतू अनेक वर्ष लोटून देखील उद्योग सुरु करण्यात आले नाही. अशा भुखंडधारकांचे प्लॉट ताब्यात घेऊन छोटे, मोठे उद्योजक तसेच बचतगटांना उद्योगांची संधी निर्माण करुन देण्यासाठी वितरीत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी बैठकीत दिल्या. आर्वी, आष्टी व कारंजा येथे सुध्दा एमआयडीसी सुरु करण्यासाठी जागेचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिाकाऱ्यांनी दिल्या.

    वर्धा एमआयडीसीतील 601 भूखंडापैकी 557 भूखंडाचे वाटप करण्यात आले असून 232 भूखंडधारकांनी उद्योग सुरु केलेला आहे. 100 भूखंडावर उद्योगाचे बांधकाम सुरु असून 72 उद्योग बंद आहे. वाटप करण्यात आलेल्या 153 भूखंडधारकांनी अद्याप उद्योग सुरु केलेला नाही. उद्योग सुरु केलेला नसलेल्या 8 भूखंड धारकांकडून भूखंड परत घेण्यात आले असल्याचे महेंद्र पाटील यांनी सांगितले. उद्योगामध्ये बालकामगार नसल्याची खात्री करुन कामगारांना कामावर ठेवावे. बालकांना कामावर ठेवल्याचे आढळून आल्यास कायदेशिर कारवाई करावी. उद्योगामध्ये स्थानिक कामगारांचीच नियुक्ती करावी, अशा सुचना देखील बैठकीत देण्यात आल्या.

    जिल्ह्यात एकुण 14 मोठे व विशाल उद्योग असून या उद्योगात 9 हजार 571 कामगार कार्यरत आहे. यामध्ये पर्यवेक्षकीय 1 हजार 40 कामगार असून 81 टक्के स्थानिक तर इतर पर्यवेक्षकीय मध्ये 9 हजार 571 कामगार असून 91 टक्के स्थानिक आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम तथा उद्योग आधार व उद्यम उद्योगामध्ये 37 हजार 906 उद्योग आहे. यामध्ये 90 हजार 236 कामगार आहे. तर पर्यवेक्षिय 15 हजार 391 असून 76 टक्के स्थानिक आहे. 89 हजार 640 इतर पर्यवेक्षकीय आहे. यामध्ये 81 टक्के स्थानिक असल्याचे सुप्रिया बावनकुळे यांनी सांगितले.