चाकण येथे 100 खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास मंजुरी, डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश

महाराष्ट्रातील चाकण, पालघर, सातारा, पेण, जळगाव आणि पनवेलसह देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये स्थापन करण्यास मंजुरी

चाकण : येथे 100 खाटांचे कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारण्यास ईएसआय कॉर्पोरेशनच्या रविवारी (दि.19 जून) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत करत शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय श्रममंत्री भुपेन्द्र यादव यांचे आभार मानले आहेत असे वृत्त एमपीसी न्यूज वृत्तसंस्थेने दिले आहे.

    चाकण एमआयडीसी क्षेत्रात शेकडो कंपन्या उभ्या राहिल्या. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा 'ईएसआय'ची रक्कम कापून घेतली जात होती. परंतु, कामगारांना वैद्यकीय उपचारासाठी पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात किंवा खासगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे चाकण येथे कामगार विमा योजनेचे रुग्णालय उभारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीय श्रममंत्री भुपेन्द्र यादव यांनी प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पत्र खासदार डॉ. कोल्हे यांना पाठवले होते.

     काल श्रममंत्री यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ईएसआय कॉर्पोरेशन, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या 188 व्या बैठकीत महाराष्ट्रातील चाकण, पालघर, सातारा, पेण, जळगाव आणि पनवेलसह देशभरात 23 नवीन 100 खाटांची रुग्णालये स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे चाकण (ESIC) एमआयडीसी क्षेत्रातील लाखों कामगारांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून खासदार डॉ. कोल्हे यांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे मागील अनेक वर्षांपासूनची कामगारांची मागणी पूर्ण होणार आहे.

     या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, चाकण एमआयडीसीची निर्मिती होऊन 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. येथील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांच्या वेतनातून दरमहा कोट्यवधी रुपये ईएसआय कार्पोरेशनकडे जमा होतात. मात्र त्या बदल्यात कामगारांना स्थानिक स्तरावर ईएसआय रुग्णालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कोविड साथीच्या काळात कामगारांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे चाकण, रांजणगाव, तळेगाव या सर्व एमआयडीसीतील कामगारांसाठी मध्यवर्ती अशा चाकण परिसरात कामगार विमा रुग्णालय आवश्यक आहे. या विचारातूनच मी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या श्रममंत्रालयाकडे पाठपुरावा करीत होतो.

कामगार विमा रुग्णालय (ESIC) उभारणीमुळे हजारो कामगारांना याचा फायदा होणार आहे.