पिंपरी : आशाताई तुम्ही काळजी करू नका तुमचा हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुम्हाला तुमचे न्याय हक्क मिळवून देणारच अशी ग्वाही राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणार्या आशा सेविकांना दिली. राष्ट्रीय श्रमिक आघाडी महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने संत तुकाराम नगर येथील तुकाराम महाराज पुतळा प्रांगणात आशा सेविकेंना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले या वेळी यशवंतभाऊ भोसले बोलत होते.
राज्यातील अशा सेविकांना पाच हजार रुपयाच्या तुटपुंज्या मानधनावर आठ ते दहा तास राबवून घेतले जाते. कोरोना काळात तर या सेविकांनी केलेले काम कौतुकास्पद होते त्यांनी रुग्ण सेवा तर केलीच पण कोरोना लसीकरण यशस्वी करण्यात या आशा सेविकांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार यशवंतभाऊ भोसले यांनी यावेळी काढले. यशवंतभाऊ पुढे म्हणाले की, दरमहा पाच हजार रुपयांच्या मानधनावर तुम्ही उदरनिर्वाह कसा करता याचे आश्चर्य वाटते. सफाई कर्मचारी देखील 18 ते 20 हजार रुपये वेतन घेतो.
यावेळी यशवंतभाऊ म्हणाले की, गरोदर असलेल्या मातेला औषधोपचार, संतुलीत आहाराबद्दलची माहिती देणे तसेच त्या मातेचे नांव रुग्णालयात दाखल करणे अशा जबाबादार्या आशा सेविका पार पाडतात त्याबदल्यात त्यांना तीनशे रुपये दिले जातात व त्यातीलही शंभर रुपये कापून घेतले जातात हे दुर्दैवी असल्याची खंत यशवंतभाऊ यांनी यावेळी व्यक्त केली. तुम्हा सर्व आशा सेविकांना तुमचा न्याय हक्क मिळवून देणारच यासाठी हवी ती लढाई लढण्याची तयारी आहे मात्र आशा सेविकांनी संघटित राहिले पाहिजे व राष्ट्रीय श्रमिक आघाडी करणार असलेल्या प्रयत्नांना पाठबळ दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आशा सेविकांना स्थानिक स्वराज्य संस्थेला लागू असलेले किमान वेतन तसेच इतर सर्व सवलती आपण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करु त्याच बरोबर निवृत्तीच्या काळापर्यंत त्यांच्या सेवेला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने त्यांचे हक्क आपण मिळवून देऊ असेही यशवंत भोसले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चाकण येथील उद्योजक पै. जयदेव अक्कलकोटे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन संतोष टाकळे, कृष्णा शिखरे, आशा आहेर, सुजता गायकवाड, यांनी केले. यावेळी सशांक इनामदार, दिपक पाटील, दिनेश पाटील, दत्तात्रय गायकवाड, राहुल शितोळे, अकबर चौधरी, करण भालेकर आदी उपस्थित होते.