पुणे : महाराष्ट्र शासनाच्या पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळ आणि पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये कामे करणाऱ्या माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्यास सतत दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी या दोन्ही माथाडी मंडळातील नोंदीत कामगारांचा शिवाजीनगर, पुणे येथील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.
पुणे माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार मंडळ आणि पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सभासद असून, या कामगारांच्या न्याय प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे अप्पर कामगार आयुक्त, माथाडी बोर्डाचे अधिकारी व संबंधित सतत दिरंगाई करीत आहेत.
पुणे येथे माथाडी कामगारांसाठी टोळी पध्दत लागू करण्याकरीता तत्कालीन अप्पर कामगार आयुक्त चोळके यांनी तयार केलेल्या अहवालानुसार कार्यवाही करणे, या मार्केटमधील पालावाला महिला कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळणे तसेच याच मार्केटमध्ये अनोंदीत/डमी कामगार कामे करीत आहेत. त्यांच्यावर माथाडी मंडळाकडून कारवाई होणे, मे.उत्तरा फिडस प्रा.लिमिटेड, केतकावळे, जिल्हा-पुणे येथे काम करणाऱ्या पुणे माथाडी बोर्डातील टोळी नं.1350 मधील माथाडी कामगारांना त्यांचे हक्काचे काम मिळवून देणे यांसह इतर प्रश्नांची सोडवणूक अप्पर कामगार आयुक्त आणि पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळाकडून होत नाही.
पुणे व पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबद्दल अनेकवेळा निवेदने सादर केली. संयुक्त बैठका आयोजित केल्या. मात्र, न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यास जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच नाईलाजाने माथाडी कामगारांचा अप्पर कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणे भाग पडले असल्याचे माथाडी कामगार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे व माथाडी कामगारांचे न्याय प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.