एलिक्झर सोल टेक या रंगांचे स्प्रे बनविणाऱ्या कंपनीला आग

खेड-शिवापूर : कासुर्डी (ता.भोर, पुणे) येथील एलिक्झर सोल टेक या रंगांचे स्प्रे बनविणाऱ्या कंपनीला आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व कामगार सुखरूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र आग मोठ्या प्रमाणावर असल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुमारे दोन तासानंतर चार अग्निशामक बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

    याबाबत राजगड पोलिस आणि महसूल विभागाने माहिती दिली. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या मध्यभागी काहीतरी फुटून पेट घेतल्याचा आवाज आला आणि मध्यभागी आग लागली. हे समजताच दोन्ही बाजूला असलेल्या दरवाजामधून कंपनीतील कामगार ताबडतोब बाहेर पडले. त्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. तर आठ दुचाकी वाहनेही या आगीत जळून खाक झाली आहेत.

    राजगड पोलिसही घटनेची माहिती मिळताच ताबडतोब घटनास्थळी आले. आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. धुराचे मोठे-मोठे लोट कंपनीमधून निघू लागले. थोड्या वेळातच भागातील बघ्यांची घटनास्थळी गर्दी जमा झाली. काही वेळात पुणे आणि भोर येथून अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पाण्याचे टँकर आणि अग्निशामक दलाचे पाच बंब यांच्या साहाय्याने सुमारे दोन तासात ही आग आटोक्यात आली.