मसूर : सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२२च्या पगारापासून १२ टक्के पगारवाढ लागू करण्यात आल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन, महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि कारखान्याचे संचालक जशराज पाटील यांचा कारखाना कर्मचाऱ्यांच्यावतीने, सह्याद्रि साखर कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी सत्कार करून आभार मानले असे वृत्त नवराष्ट्र वृत्तसंस्थेने दिले आहे.
याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, आर. जी. तांबे, प्रताप चव्हाण, आप्पासो साळुंखे, बलराज पाटील, प्रकाश पवार, अशोक नलवडे, रमेश जाधव, प्रकाश यादव, पृथ्वीराज सोनवणे, दयानंद गोरे, विजय यादव, रामचंद्र जगताप, बाबासो चव्हाण, संभाजी चव्हाण, बाळासो माळवे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी दि. १२ जानेवारी २०२०च्या शासन निर्णयानुसार, कारखाना प्रतिनिधी व कामगार प्रतिनिधी यांच्यामध्ये सलोखा घडवून आणून त्रिपक्षीय समितीची स्थापना करण्यात आली होती. उभय पक्षामध्ये सखोल चर्चा होवून सामंजस्य करार करण्यात येवून, संबंधित सदस्यांच्या स्वाक्षरीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता.
जानेवारी २०२२च्या पगारापासून मिळणार पगार वाढ
याबाबत शासनस्तरावर सकारात्मक विचार विनिमय होवून, त्रिपक्षीय समितीने शासनास सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केलेल्या सर्व शिफारशींच्या अनुषंगाने केलेल्या करारनाम्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत दि.२९ ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने कारखान्यातील कर्मचार्यांना १२ टक्के वेतनवाढ लागू केलेली आहे. सदरची वेतनवाढ जानेवारी २०२२ च्या पगारापासून दिली जाणार असल्याबद्दल, सह्याद्रि साखर कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांनी संपूर्ण संचालक मंडळाचे आभार मानले.