खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने आज देण्यात येणार पुरस्कार
पिंपरी : शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती व संस्थांचा सन्मान बुधवारी (ता.१६) चिंचवड येथे होणार असून यामध्ये कामगार नेते किशोर ढोकले यांना 'कामगार भूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सचिन अहीर, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.
खासदार श्रीरंग अप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (ता.१६) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कामगार नेते किशोर ढोकले हे कामगार क्षेत्रामध्ये मागील ३० वर्षापेक्षा अधिक काळ नेतृत्व करत आले असून आज पर्यंत केलेल्या कार्याबद्दल विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहे. आज अखेर विविध कंपन्यांचे १२५ वेतन करारामध्ये त्यांनी प्रमुख सहभाग घेतला आहे. किशोर ढोकले हे राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ संस्थापक अध्यक्ष असून या महासंघाद्वारे १५२ कामगार संघटनांचे नेतृत्व करण्यात येत आहे. आदर्श कामगार नेते म्हणून किशोर ढोकले यांच्याकडे पाहिले जाते.