युनियन व कामगार संबंधीचा पत्रव्यवहार मराठी भाषेत करण्याचे कामगार कार्यालयाचे कंपनीला निर्देश

सणसवाडी : कंपनी व्यवस्थापनाने युनियन व कामगार संबंधीचा पत्रव्यवहार मराठी भाषेत करावे असे निर्देश सहायक कामगार आयुक्त पुणे यांनी फोसेको इंडिया लिमिटेड कंपनीला दिले आहेत अशी माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.

सविस्तर प्रकरण काय आहे -

    सणसवाडी येथील फोसेको इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने प्रथमता फोसेको इंडिया लिमिटेड या कंपनी व्यवस्थापनाला पत्रव्यवहार करून कामगार अथवा युनियन ला द्यायची नोटीस अथवा कोणतेही पत्र व्यवहार किंवा माहिती द्यायची असेल ती संबंधित कामगाराला समजत असेल अशा भाषेत असले पाहिजे तसेच कंपनीच्या ज्या जिल्ह्यात असेल त्या जिल्ह्याच्या प्रमुख प्रादेशिक भाषेतही असली पाहिजे अशी तरतूद कामगारांना लागू असलेल्या  स्टॅंडिंग ऑर्डर्स चे कलम 31 मध्ये स्पष्ट असून सदर तरतुदीनुसार युनियन च्या वतीने कंपनी व्यस्थापनाला दि. ५/०२/२०१९ नुसार पत्रव्यवहार करण्यात आला.

    युनियन मागणीनुसार व्यवस्थापनाने त्यानंतर मराठी भाषे मध्ये पत्रव्यवहार सुरू केला होता परंतु नंतर पुन्हा मराठी भाषेत पत्रव्यवहार करण्यास व्यवस्थापनाने नकार दिला. 

      यामुळे युनियन च्या वतीने दि. २७/११/२०२१ रोजी पुन्हा कंपनी व्यवस्थापनाला मराठी भाषेचा वापर करण्याची मागणी करण्यात आली व तसेच कामगार उप आयुक्त कार्यालय पुणे यांच्या कडे पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त डी डी पवार यांनी फोसेको इंडिया लिमिटेड कंपनी व्यवस्थापनास संघटनेशी मराठीत पत्रव्यवहार करावा असे सूचित केले आहे.