दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर येथील मेगाफाईन कंपनीत स्फोट होऊन (ता.२१) झालेल्या दुर्घटनेत एक ठार व चार जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लखमापूर शिवारातील मेगाफाईन या कंपनीत मध्यरात्री एका विभागातील रिअॅक्टर मशिनला अचानक आग लागून स्फोट झाला असे वृत्त My महानगर वृत्तसंस्थेने दिले आहे.
यामध्ये त्या विभागांमध्ये काम करणारे कामगार केशव सुनीराम धुळे (रा. ननाशी, ता.दिंडोरी), बाजीराव निवृत्ती चव्हाण (रा.अंजनेरी, ता.त्र्यंबकेश्वर), रवींद्र गोपाळा गोर्हाळे (रा.दोनवडे)हे किरकोळ जखमी झाले असून, कमलेश रमेश गवळी व संदीप वसंत गायकवाड (रा. मडकीजांब) हे गंभीर जखमी झाले. त्यात उपचारादरम्यान संदीप गायकवाडचा मुत्यू झाला.
या घटनेची माहिती कंपनीचे प्रॉडक्शन अधिकारी प्रमोद बाळकृष्ण बच्छाव यांनी तात्काळ वणी पोलिसांना कळवली. वणी पोलिसांत अकस्मात जळीत प्रकरण म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, पी. आर. शेलार, धुळे आदी तपास करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.