राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या स्थलांतरणावर संतप्त प्रतिक्रिया
नागपूर : कामगारांना त्यांच्या हक्काबाबत शिक्षण, प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृत करणारे नागपुरातील दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळाचे (नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट) मुख्यालय दिल्ली येथे स्थलांतरित करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
दिल्लीतील अधिकारी नागपुरात रुजू होण्यास तयार नसल्याने मुख्यालयातील पदे रिक्त होती. त्याचा परिणाम कामकाजावर होत होता. दिल्लीत कामगार मंत्रालय असल्याने कामकाजाच्या सोयीसाठी प्रशासकीय मुख्यालय तेथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर पाच वर्षांपूर्वी झाला होता. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्याने मधल्या काळात ही प्रक्रिया थांबली. पण एक वर्षांपासून तिला पुन्हा गती आली. अखेर कामगार मंत्रालयाने नागपूर मुख्यालय स्थलांतरित करण्याबाबत आदेशच काढले. यावर तीव्र प्रतिक्रिया कामगार संघटनामध्ये उमटल्या आहेत.
नागपूर हृदयस्थानी असल्याने देशभरातील कामगारांना येथे येऊन प्रशिक्षण घेणे सोयीचे होते. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळाकडून प्रशिक्षण शिबिरे घेतली जात होती. यात हजर राहणाऱ्या मंजुरांना निम्मी मजुरी सुद्धा दिली जात होती. यातून कामगारांना त्यांच्या हक्काची जाणीव होत होती, असे कामगार नेते हरीश धुरट म्हणाले.
भारतीय कामगार संघाचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश चौधरी यांनी मात्र केंद्राचे फक्त प्रशासकीय मुख्यालय येथून जाणार आहे. बाकी सर्व व्यवस्था येथेच राहणार असल्याने कामगारांच्या प्रशिक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.