कंपनीला आग लागून चार कामगार होरपळले

शिरूर - रांजणगाव एमआयडीसीतील प्लॅस्टिक, पेपर व स्टेशनरी सप्लाय करणा-या कंपनीला आग लागून चार कामगार होरपळले. शनिवारी (ता. ४) घडलेल्या या घटनेची अद्याप पोलिस दप्तरी नोंद झाली नसल्याने आगीतील नूकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.

     'आदेश पॅकेजिंग प्रा. लि.' या कंपनीत ही दूर्घटना घडली. आग लागल्यानंतर रांजणगाव एमआयडीसीतील फायर ब्रिगेडच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी दूर्घटना टळली. 

     दरम्यान, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे व अग्निशमन अधिकारी वैभव पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याचे आदेश दिले होते. या जळीताची नोंद घेण्याचे आदेश पोलिसांना दिले; परंतू कंपनीचे प्रतिनिधी जबाब देण्यासाठी न आल्याने या दूर्घटनेत झालेल्या नूकसानीची माहिती पोलिसांना मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

    दरम्यान, या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप आगीचे नेमके कारण समजू शकले नसून पोलिस त्यादृष्टीने तपास करीत आहेत. या दूर्घटनेवेळी कंपनीत असलेल्या कामगारांपैकी चौघेजण होरपळले असल्याची पोलिस तपासातील प्राथमिक माहिती असून, त्यातील दोघांना पुण्यातील रूग्णालयात; तर इतर दोघांना शिरूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.