कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरीच्या कामगारांनी (Workers) पुकारलेला नियोजित संप अखेर रद्द करण्यात आला आहे असे वृत्त दैनिक गोमन्तक वृत्तसंस्थेने दिले आहे.
गोवा डेअरी (Goa dairy) कामगारांनी आपल्या मागण्यांच्या (Demands) पूर्ततेसाठी गोवा डेअरीला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने उद्या (बुधवारपासून) संप पुकारण्यात येणार होता.
काल (मंगळवारी) गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी संपावर जाऊ इच्छिणाऱ्या कामगार संघटनेकडे यशस्वी शिष्टाई केल्याने नियोजित संप बारगळला आहे.
गोवा डेअरीच्या कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करणे, तसेच महागाई भत्ता देण्यासंबंधीच्या दोन मागण्या गोवा डेअरीकडे केल्या होत्या. यासंबंधीचे एक निवेदन कामगार संघटनेने गोवा डेअरीच्या प्रशासकीय समिती तसेच कार्यकारी व्यवस्थापकीय संचालकांना दिले होते. या निवेदनात गेल्या ६ तारखेपर्यंत काय ते कळवा? असे सांगितले होते. मात्र, गोवा डेअरीकडून कोणताच सकारात्मक निर्णय न झाल्याने अखेर कामगार संघटनेने संपाचे हत्यार उपसले होते.
बुधवारी ८ ते शुक्रवारी १० तारखेपर्यंत हा संप होणार होता. मात्र, गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी संपकरी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढला.
कामगारांचा महागाई भत्ता येत्या डिसेंबरच्या पगारात (Salary) अदा करण्यात येईल. तसेच फरकाची रक्कम दोन हप्त्यांत देण्यात येणार आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी डेअरीची आर्थिक स्थिती तपासून नंतरच हा निर्णय घेण्यात येईल. यासंबंधीचा निर्णय सहकार निबंधकांकडे पाठवण्यात येईल, असे दुर्गेश शिरोडकर यांनी सांगितले.
कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गेश शिरोडकर यांच्या निर्णयाचे स्वागत करून शेवटी संप मागे घेतला असल्याचे जाहीर केले. दरम्यान, गोवा डेअरीच्या दोन कामगार संघटना असून एका संघटनेने हा संप पुकारला होता. या बैठकीवेळी दुर्गेश शिरोडकर यांच्यासमवेत कामगार संघटनेचे पदाधिकारी राजू गावकर, हेमंत सामंत, तुळशीदास गावडे, नीलेश सतरकर, दिवेश नाणूसकर, प्रवीण गावस, वामन नाईक, गुरुनाथ गावकर आदी तसेच गोवा डेअरीच्या संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. गोवा डेअरीचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक मात्र या बैठकीला अनुपस्थित होते.