नागपूर : राष्ट्रवादी विचाराने भविष्यातील भारताची निर्मिती करायची आहे. राष्ट्रवाद हा सर्वोपरी आहे. कामगारांच्या हिताचे रक्षण करणे हे आपले कार्य आहे. मात्र त्यासोबतच देशहितही महत्त्वाचे आहे.हे दोन्ही राष्ट्रवादी विचारधारेचा भाग आहे. त्यामुळे कामगारहित आणि देशहित यामध्ये समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या 9 व्या त्रैवार्षिक द्विदिवसीय अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा शनिवारी रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते असे वृत्त तरुण भारत नागपूर वृत्तसंस्थेने दिले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश होळीकर तर प्रमुख अतिथी म्हणून अ. भा. वि. म. महासंघ प्रभारी एल. पी. कटकवार, महामंत्री अमरसिंह साखला, माजी अध्यक्ष बाबासाहेब हरदास, अण्णाजी देसाई, अनिल ढुमणे, माहिती कार्याध्यक्ष दत्तात्रेय धामणकर उपस्थित होते.
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचारांचे वैचारिक मार्गदर्शन तसेच राष्ट्रवादी विचारांचे पुनरुज्जीवन यावरील त्यांचे चिंतन प्रभावी आहे. ते बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित व्हावी हा त्यांनी विचार दिला. त्यांच्या विचारांची छाप संघटनेच्या विचारधारेवर असून त्या दिशेने संघटन कार्य करीत आहे. महत्वाचे म्हणजे, समर्पित कार्यकर्ते हीच मजदूर संघाची ताकद आहे, असेही गडकरी म्हणाले. तसेच त्यांनी जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रिब्युशन यासाठी कशा पद्धतीने काम करण्याची गरज आहे. सोलर पॉवर, ग्रीन पॉवर, ग्रीन हॉयड्रोजन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग याचेही महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सावजी यांनी केले. संचालन शंकर पहाडे यांनी केले. या दोन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.