बारामती : महिला सबलीकरणाला नेहमीच कृतीतून प्रोत्साहन दिले. त्याचाच एक भाग म्हणून बारामती एमआयडीसीमध्ये पियाजो व्हेईकल्स प्रा. लि. या कंपनीमध्ये वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या जुळणीचे काम १०० टक्के महिलांच्या हातात देण्यात येणार आहे. अॅपे ई-सिटी आणि अॅपे ई- एक्स्ट्रा या दोन बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची जुळणी आता संपुर्णपणे महिला कामगार करणार आहेत. महिलांना अनुरुप अशी कामाच्या जागेची रचनाही केली जाणार आहे असे वृत्त महान्यूज LIVE वृत्तसंस्थेने दिले आहे.
याबाबत माहिती देताना कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्राफी यांनी सांगितले, आमच्या कंपनीच्या तत्वप्रणालीनूसार आम्ही बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या जुळणीच्या सर्व टप्प्यांवर महिलांना संधी देत आहोत. ही केवळ सुरुवात आहे आणि यापुढील काळात आमच्या कंपनीच्या सर्व विभागात महिलाची संख्या वाढत जाणार आहे.
कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रमुख पुजा बन्सल म्हणाल्या, कामगार शक्तीमध्ये विविधता असली तर त्याचा नाविन्यपूर्ण कामासाठी आणि कंपनीच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो. पियाजो कंपनी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी , त्यांना काम करण्याच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहे. यापुढील काळात कंपनीचे व्यवस्थापन आणि नेतृत्व करण्यापर्यंत महिलांनी सक्षम व्हावे ही आमची अपेक्षा आहे.