एच.ए.एल. कामगार संघटनेच्या ऑनलाईन निवडणुकीस विरोध

नाशिक : एच.ए.एल. कामगार संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक ऑनलाइन घेण्याच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेसमोर ठेवलेल्या पर्यायास श्रीविश्वास ग्रुपचा विरोध असून, ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेत खूप साऱ्या त्रुटी असल्याने कामगार संघटनेची निवडणूक सिक्रेट बॅलेट पेपरद्वारेच घेण्यात यावी, अशी मागणी कामगार संघटनेचे विरोधी गटाचे सहचिटणीस व श्रीविश्वास ग्रुपचे प्रमुुख गिरीश वलवे यांनी संघटनेचे सरचिटणीस सचिन ढोमसे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे असे वृत्त लोकमत वृत्तसंस्थेने दिले आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कामगार संघटनेची प्रलंबित निवडणूक तातडीने घेण्यास आजी माजी पदाधिकाऱ्यांनी संमती दिलेली आहे; पण कामगार संघटनेच्या नियमावलीनुसार निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीने होणे अपेक्षित आहे. तशी संघटनेची नियमावली आहे. तरीसुद्धा व्यवस्थापनाने ऑनलाइन निवडणुकीचा पर्याय कामगार संघटनेसमोर ठेवत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व सर्व गटाचे कार्यकर्ते यांना ऑनलाइन निवडणूक डेमो दाखविला; परंतु ऑनलाइन निवडणूकप्रणालीत बऱ्याच त्रुटी आहेत. या सगळ्या त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय निवडणूक होऊ शकणार नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही प्रत्येक पदासाठी आणि निशाणी चिन्हांसहित अंकित नाही, कॉम्प्युटर स्क्रीन ही कुठल्याही पासवर्डविरहित नसल्याने कामगारांच्या मतदानाविषयी गुप्तता पाळता येत नाही, मतदान केल्यानंतर त्यांची प्रिंट निघून मतपेटीत टाकण्याची सुविधा त्यात नाही, फेरमतमोजणी करायची सुविधा नाही, यासह बऱ्याच त्रुटी या प्रक्रियेत आहेत.

१५ दिवसांपूर्वीच एचएएल हैदराबाद डिव्हिजनच्या कामगार संघटनेची निवडणूक आणि नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसची निवडणूक सिक्रेट बॅलेट पद्धतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे मतपत्रिकेद्वारेच कामगार संघटनेची निवडणूक व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संघटनेतील विरोधी गटाचे सहचिटणीस गिरीश वलवे, पवन आहेर, योगेश आहिरे, सचिन धोंडगे, कैलास सातभाई, मनोहर खालकर या पदाधिकाऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत