नवी दिल्ली: EPFO सदस्यांसाठी एक मोठी बातमी आहे. पीएफ खातेधारकांच्या किमान पेन्शनची रक्कम लवकरच वाढू शकते. यासाठी ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची लवकरच बैठक होणार आहे असे वृत्त TV 9 मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस होणाऱ्या या बैठकीत या मोठ्या निर्णयाला हिरवा कंदील मिळू शकतो. पेन्शनची किमान रक्कम हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे.
केंद्रीय कामगार संघटनांनी किमान पेन्शनची रक्कम सध्याच्या 1,000 रुपयांवरून 6,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. तर केंद्रीय विश्वस्त मंडळ किंवा CBT ते 3,000 रुपयांपर्यंत नेऊ शकते. खाजगी कॉर्पोरेट बाँडमध्ये ईपीएफओचे पैसे गुंतवण्याचा वादग्रस्त मुद्दाही बैठकीत चर्चेसाठी येऊ शकतो. CBT 2021-22 साठी पेन्शन फंडाचा व्याजदर काय असावा या मुद्द्यावरही चर्चा करू शकते.
सीबीटी किमान पेन्शन 3,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. कामगार स्थायी समितीने नुकतीच केंद्राला किमान पेन्शन 3,000 रुपये करण्याची शिफारस केली होती.