नवी दिल्ली : केंद्रीय कामगार मंत्रालयाने ई-श्रम (e-Shram) पोर्टल सुरु केलं आहे. त्या माध्यमातून देशातील जवळपास 38 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पोर्टलच्या साह्याने ई-श्रम कार्ड (e-Shram Card) तयार करणाऱ्या कामगारांना अनेक सुविधा सरकारतर्फे दिल्या जाणार आहेत. तसंच, त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. देशातल्या प्रत्येक कामगाराची नोंद याअंतर्गत केली जाणार असून, त्यामुळे कोट्यवधी कामगारांना नवी ओळख मिळणार आहे.
असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. त्याअंतर्गत देशातल्या सुमारे 38 कोटी कामगारांना 12 अंकी युनिव्हर्सल अकाउंट नंबर दिला जाणार असून, ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे. हे कार्ड संपूर्ण देशभर स्वीकारार्ह असेल.
या कार्डमुळे स्थलांतर करणाऱ्या कामगारांना ट्रॅक करणं सोपं होणार आहे. सगळ्या कामगारांचा डेटा आणि माहिती एकत्रितरीत्या सरकारला उपलब्ध होणार आहे. कामगारांनी ओळखपत्र (Identity Card) आणि आधारकार्डाच्या (Aadhaar Card) साह्याने नोंदणी केल्यावर त्यांच्या कामाच्या प्रकाराच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. त्यामुळ त्यांना योग्य त्या सरकारी योजनांचा (Government Schemes) लाभ देणं शक्य होणार आहे.
e-SHRAM कार्डसाठी कसे करावे रजिस्ट्रेशन? (how to register on e-SHRAM portal)
- https://www.eshram.gov.in/ टाइप करा.
- यानंतर होमपेजवर, ई-श्रमवर नोंदणी करा च्या लिंकवर क्लिक करा.
- सेल्फ रजिस्ट्रेशनवर यूजरला आपला आधार लिंक्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल. नंतर Captcha टाका
- मोबाइल नंबर OTP सेंड करा. आलेला OTP टाका
- नंतर नोंदणी प्रकिया पूर्ण करण्यासाठी बँक खात्याच्या डिटेल नोंदवा आणि पुढील प्रक्रियेचे पालन करा.
- eshram.gov.in वर दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जवळच्या सीएससीवर जाऊ शकता आणि बायोमेट्रिक पडताणी प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करू शकता.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विमा
ई-श्रम पोर्टलवर सर्व राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंद करावी असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांच्या विम्याचे कवच देण्यात येणार आहे. तसेच अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
