कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय असेल तरच कारखानदारी टिकेल - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

वालचंदनगर : कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात समन्वय असेल तरच कारखानदारी टिकण्यास मदत होईल, वालचंदनगर शहराला पून्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून वालचंदनगर च्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असे वृत्त महान्यूज LIVE वृत्तसंस्थेने दिले आहे.

     वालचंदनगर व्यवस्थापन व आय एम डी कामगार समन्वय संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञानदिप हाॅल येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार संघटनेच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कंपनी व कामगार यांच्या विविध प्रश्नांबाबत केलेल्या मदत कार्याबद्दल भरणे यांचा सत्कार वालचंदनगर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर शुक्ला, महाराष्ट्र राज्य कामगार नेते शिवाजीराव खटकाळे, कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे प्रमुख धिरज केसकर, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

    यावेळी भरणे म्हणाले, वालचंदनगर या शहराचे आणि माझे जिव्हाळ्याचे नाते आहे. या ठिकाणी काम करत असलेला कामगार हा माझ्या कुटुंबातील एक सदस्य आहे. यापुढील काळात कामगार बांधवांनी अफवांवर विश्वास न ठेवता कामगार आणि व्यवस्थापन समिती यांच्यात चांगल्या पध्दतीने समन्वय ठेवून वालचंदनगर शहराला पून्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावा. वालचंदनगर शहराच्या भौतिक सुविधांकरिता तालूक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून कोट्यवधी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

    यावेळी कामगार नेते शिवाजीराव खटकाळे भाऊ यांनी प्रास्ताविक केले. आय एम डी कामगार समन्वय संघाचे अध्यक्ष नंदकुमार गोंडगे, जनरल सेक्रेटरी प्रविण बल्लाळ तसेच आय एम डी कामगार समन्वय संघाचे सर्व प्रतिनिधी, व्यवस्थापन प्रतिनिधी, कामगार उपस्थित होते. अधिकारी संजीव गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले, आभार केसकर यांनी मानले.