बांधकाम कामगारांवरती होत असलेल्या अन्यायाला येत्या हिवाळी अधिवेशनात वाचा फोडू - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांच्या निवेदनाची माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल

वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने दिनांक 23 जुलै 2020 पासून बांधकाम कामगारांना जलद गतीने लाभ मिळण्याकरिता कल्याणकारी मंडळाची संपूर्ण यंत्रणा ऑनलाईन  स्वरुपाची केली आहे. मात्र वर्धा जिल्हातील या ऑनलाईन प्रणालीचे दुष्परिणाम दिसू लागले आहे. दि.23 जुलै 2020 पासून वर्धा जिल्हातील बांधकाम कामगार हा नोंदणी, नुतनीकरण व विविध लाभा पासून अद्यापही वंचित आहे. 

      मागील वर्षापासून नोंदणीकृत पात्र कामगारांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये विविध स्वरूपाचे अनुदानाचे अर्ज दाखल केलेले आहे. मात्र वर्ष लोटूनही बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून  वंचित राहावे लागत आहे. अशा या ऑनलाईन प्रणालीमुळे जिल्हातील बांधकाम कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

       मंडळाच्या ऑफलाईन कार्य प्रणालीमध्ये बांधकाम कामगारांनी नोंदणी करिता संपूर्ण कागदपत्रासह कामगार अधिकारी कार्यालयात नोंदणी अर्ज दाखल केल्यावर 15 दिवसाच्या आत बांधकाम कामगाराला नोंदणी ओळखपत्र मिळत होते. मात्र आता ऑनलाईन प्रणालीमध्ये बांधकाम कामगाराने नोंदणी अर्ज दाखल केल्यावर 6 ते 8 महिने ओळखपत्र मिळत नाही. तसेच बांधकाम कामगारांचे ओळखपत्र नुतनीकरण करण्याकरीता अर्ज दाखल केल्यावर 6 ते 8  महिन्याचा कालावधी लागतो. मंडळाच्या ऑफलाईन कार्य प्रणालीमध्ये  बांधकाम कामगारांची विविध अनुदाना करिता अर्ज दाखल केल्यास 1 महिन्याच्या आता त्याच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा होत होते. मात्र आता ऑनलाईन प्रणालीमध्ये वर्ष लोटूनही बांधकाम कामगारांना अनुदान मिळत नाही. 

      सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात मागील एक वर्षा पासुन बांधकाम कामगारांचे नोदणी, नुतनीकरण व विविध अनुदानाचे अर्ज ऑनलाईन पोर्टल वर प्रलंबित आहे. त्यामुळे वर्धा जिल्हातील बांधकाम कामगार मंडळाच्या विविध योजने पासून वंचित आहे. या सह वर्धा जिल्हातील विविध स्वरूपाचे बांधकाम कामगारांच्या समस्या स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश अग्निहोत्री यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडले. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत वर्धा जिल्हातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्या बाबतीत  त्यांच्या नागपूर येथील निवास स्थानी अर्धा तास सकारात्मक  चर्चा करण्यात आली. 

      सदर चर्चे नंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की येत्या हिवाळी अधिवेशनात  वर्धा जिल्हातील बांधकाम कामगारांचा प्रश्न सभागृहात उपस्थित करून कामगारांना न्याय देण्यासाठी मी प्रयत्ने करील. यावेळी स्वाभिमानी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष उमेश रा. अग्निहोत्री, भाजपा. प्रदेश सचिव राजेश बकाने, राहुल चोपडा, प्रवीण चोरे उपस्थित होते.