वीज कंत्राटी कामगारांसाठी HDFC बँक खात्याचे उदघाटन

पुणे : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कोरोना काळात सुमारे  55 कंत्राटी कामगारांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला मात्र या कामगारांच्या वारसाला महावितरण कंपनी अथवा शासना कडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. कामगाराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची मोठी आर्थिक हेळसांड होते याच व्यथेतून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने (संलग्न भारतीय मजदूर संघ) वेलफेअर फंड स्थापन करून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे पेड विमा घेतला परंतु तुटपुंज्या वेतनात विम्यासाठी वार्षिक हप्ता भरने देखील कामगारांना परवडत नसल्याचे संघटनेच्या लक्षात आले.

     संघटनेने बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य, नामवंत व सामाजिक भान असलेल्या HDFC या बँकेशी सहकार्य करार करून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) सदस्यांचे मोफत सॅलरी बँक अकाऊंट काढण्याचे ठरवले असून संघटनेचे सदस्य  असलेल्या HDFC बँकेच्या खातेदार असलेल्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसाला रुपये अकरा लाख रुपये इतकी रक्कम विमा स्वरूपात मिळणार आहे.

     या योजने मूळे राज्यातील हजारो कामगारांना हे सॅलरी अकाऊंट व अन्य इतर अनेक सुविधांचा लाभ अगदी मोफत मिळणार असून या माध्यमातून कामगारांच्या जीविताचा विमा निघून त्यांच्या कुटुंबियांना मोठी आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे.

     संघटने तर्फे कामगार हितार्थ राबवत असलेल्या स्तुत्य अशा उपक्रमाची सुरुवात महावितरण पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांनी कंत्राटी कामगार वैभव कागीलकर , शेखर विध्वंस यांना प्रातिनिधिक स्वरूपात नवीन वेतन बँक खाते देऊन शुभारंभ केला.  महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आनेराव, संघटन मंत्री राहुल बोडके तसेच HDFC बँकेचे मॅनेजर व सेल्स ऑफिसर उपस्थित होते. राज्यभरातील वीज कंत्राटी कामगारांनी www.mvkksangh.com या वेबसाईट वरून संघटनेचे सदस्यत्व घेऊन बँक खाते व विम्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.