तारापूर एमआयडीसीतील जखारिया कंपनीत झालेला भीषण स्फोट
तारापूर एमआयडीसीतील जखारिया कंपनीत (Jakharia Industries) झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यवस्थापनाला शिवसेनेने दणका दिला. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे जखारिया कंपनीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि कायमस्वरूपी नोकरी देण्याचे लेखी हमीपत्र दिले. त्याचवेळी जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कामगारांचा पगारही सुरू ठेवणार असल्याची ग्वाही कंपनीने दिली असे वृत्त सामना वृत्तसंस्थेने दिले आहे.
कापड निर्मिती करणाऱ्या जखारिया कंपनीत शनिवारी पहाटे बॉयलरचा भीषण स्फोट होऊन मिथिलेश राजवंशी आणि छोटेलाल सरोज या दोन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य पाच कामगार 65 टक्के भाजले. कानठळ्या बसवणाऱ्या या स्फोटामुळे तीन किमीचा परिसर हादरला होता. दरम्यान शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनीही जखमींची भेट घेऊन विचारपूस केली आणि कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या दुर्घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने फक्त विमा कंपनी नुकसानभरपाई देईल, अशी भूमिका घेतली आणि अंत्यविधीसाठी फक्त दहा हजार रुपये मिळतील, असे नातेवाईकांना बजावले. याची गंभीर दखल शिवसेनेचे बोईसर विधानसभा संघटक नीलम संखे यांना कळताच त्यांनी शिवसैनिकांसह कंपनीवर धडक दिली. कामगारांचे प्राण गेल्यानंतरही निर्दयीपणे वागाल तर खबरदार… कंपनीचे गेट उघडू देणार नाही, असा इशारा संखे यांनी दिला आणि त्यांनी कंपनीचे प्रवेशद्वार अडवून धरले. त्यानंतर कंपनीचे मालक नितीन शाह यांनी शिवसैनिकांना बोलवणे पाठवले. कामगारांना नुकसानभरपाई देण्याचे लेखी हमीपत्र देणार असाल तरच चर्चा होईल, असे नीलम संखे यांनी सुनावले. अखेर कंपनी व्यवस्थापनाने शिवसैनिकांच्या मागण्या मान्य केल्या.
अशी मिळणार मदत
- प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची कंपनीकडून भरपाई.
- मृतांच्या अंत्यसंस्काराकरिता 50 हजारांची मदत.
- जखमी कामगारांचा सर्व वैद्यकीय खर्च कंपनी करेल.
- प्रत्येक मृत कामगाराच्या एका नातेवाईकाला कायमस्वरूपी नोकरी
- जखमी कामगार नियमित नोकरीत असतील..
- ईएसआयसी दाव्यासाठी कंपनी मदत करेल.
- जखमी कामगार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होईपर्यंत त्यांना वेतन दिले जाईल.
