वेतनवाढ न केल्याने निप्रो कंपनीत कामगारांचे आंदोलन

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील निप्रो इंडियन कॉर्पोरेशन (Nipro India Corporation Pvt Ltd.) कंपनी आहे. कंपनी व कामगारांमध्ये मे महिन्यात वेतन करारातील मुद्दे 31 मे पर्यंत सोडवण्यात येतील अशी ग्वाही व्यवस्थापनाने दिली होती. त्याला कामगारांनीही सहकार्य केले मात्र दिलेल्या वेळेत वेतन करारातील मुद्दे कंपनी व्यवस्थापनाने सोडवले नाही यावरती दोन महिने उलटूनही अद्याप कंपनीकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे वेतनवाढी सह विविध मागण्यांबाबत कामगारांनी दि.४ ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केले आहे.

     मेडिकल क्षेत्रातील उत्पादन करणारी कंपनी असल्याने कोणाचे नुकसान होऊ नये त्यामुळे कंपनी बंद न ठेवता साखळी पद्धतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत कंपनीमधील कामगार कंपनी मध्ये राहणार असल्याची माहिती कामगारांकडून देण्यात आली आहे. 

     वेतनवाढी सह विविध मागण्यांबाबत निप्रो कंपनीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला असता, कंपनीने कोर्टात खटला दाखल केला आहे. 

    कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांसह तालुक्यातील विविध भागातील तरुण गेली दहा वर्षे तुटपुंज्या पगारावर आपली उपजीविका भागवत आहेत. वेतनवाढ करार त्वरित करून महागाई भत्ता, बोनस व इतर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी कामगार करत आहेत.