EPS 95 पेन्शनधारकांचा प्रश्न लवकर मार्गी लागणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी मथुरा खासदार श्रीमती हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखाली EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या बैठकीमध्ये संघटनेच्या प्रमुख 4-कलमी मागण्यांच्या संदर्भात निवेदन सादर केले असे वृत्त माय महाराष्ट्र न्यूज ने दिले आहे.

      EPS 95 पेंशनधारकांच्या दयनीय आणि मरणासन्न अवस्थेचा संदर्भ देत, कमांडर अशोक राऊत, निवृत्तीवेतनधारकांच्या वाढत्या मृत्यु दराबद्दल चिंता व्यक्त करत, निवृत्तीवेतनधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी या बाबत ची घोषणा करावी अशी विनंती केली, ज्यामुळे NAC मुख्यालय महाराष्ट्रातील बुलढाणा येथे गेल्या 956 दिवसांपासून सुरु असलेले साखळी उपोषण देखील संपुष्टात येऊ शकेल असे स्पष्ट केले.

    श्रीमती हेमा मालिनी यांनी सुद्धा माननीय पंतप्रधानांपुढे NAC च्या मागण्यांचे समर्थन करत, EPS 95 पेन्शनर्सची बाजू घेतली आणि पेन्शनर्सच्या मागण्या मान्य करण्याची विनंती केली.

      यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की " आम्ही या विषयावर आपल्या NAC शिष्टमंडळाशी आधीच चर्चा केली आहे. समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेस थोडा वेळ लागतो पण तुम्ही लोक अस्वस्थ होऊ नका. आम्ही निश्चितपणे ही समस्या सोडवू" असे म्हणत, पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह यांना निर्देश देऊन त्यांचेशी चर्चा करण्याचे सांगितले.

     पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, डॉ जितेंद्र सिंह यांनी खा.श्रीमती हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाचे युक्तिवाद आणि तथ्य ऐकले. यानंतर, शिष्टमंडळाची बैठक अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी आयोजित केली.

    डॉ.जितेंद्र सिंह आणि श्रीमती हेमा मालिनी यांच्या उपस्थितीत, एनएसीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी अर्थमंत्र्यांना विनंती केली की ईपीएस 95 निवृत्तीवेतनधारक इतक्या कमी पेन्शन रकमेमध्ये कसे जीवन जगतील? याचा संदर्भ देत ते म्हणाले की आमच्या चार-कलमी मागण्या लवकरच पूर्ण केल्या पाहिजेत. EPFO जवळ पुरेसा फंड आहे शिवाय सरकारने सुद्धा इतर पेंशन योजना प्रमाणे या EPS योजनेसाठी आपले अंशदान वाढवावे व देशातील या वृध्द EPS 95 निवृत्तीवेतनधारकांचा आदर करुन त्यांना सुरक्षा प्रदान करावी.

     अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे अतिशय काळजीपूर्वक ऐकून घेतले ,NAC अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले आणि पुन्हा एकदा लवकर निर्णय घेण्याची विनंती केली.

      EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव श्री वीरेंद्रसिंह राजावत आणि राष्ट्रीय मुख्य सल्लागार श्री डॉ. पी. एन. पाटील हे या शिष्टमंडळात उपस्थित होते.

  • 1. किमान पेन्शन रु .7500+ महागाई भत्ता देण्यात यावा.

  • 2. ईपीएफओच्या दिनांक 23.03.2017 च्या पत्रानुसार वास्तविक वेतनावर उच्च पेन्शनच्या पर्यायाची सुविधा मिळावी

  • 3. वैद्यकीय सुविधा प्रदान करावी

  • 4. ईपीएस 95 मध्ये समावेश होऊ न शकलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना योजनेत समाविष्ट केले जावे व त्यांना रु. 5000 पेन्शन देण्यात यावी.

अशा मागण्या संघटनेच्या असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी दिली.