मुंबई : जुलै महिन्याचे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना अद्यापही न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. एसटी कामगार संघटनांनी यासंदर्भात औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे वेतन ३ सप्टेंबरपर्यंत द्यावे, असे अंतरिम आदेश शुक्रवारी दिले असे वृत्त लोकसत्ता वृत्तसंस्थेने दिले आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे गेल्या महिन्याभरात राज्यात एसटीच्या पाच कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात वेतन नियमित होत नसल्याचे प्रमुख कारण असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. यामुळे धुळ्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केले.
एसटीचे प्रवासी कमी झाले आणि उत्पन्न घटले. त्यामुळे गेल्या वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याच्या ७ तारखेला होणारे वेतन नियमित होत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेतन प्रदान अधिनियम १९३६ च्या तरतुदीनुसार किमान १० तारखेपर्यंत मासिक वेतन देण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. याविरोधात मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने औद्योगिक न्यायालयात २३ ऑगस्टला दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी २७ ऑगस्टला घेण्यात आली. यात ३ सप्टेंबरपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचे अंतरिम आदेश करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
