औरंगाबाद मारहाण प्रकरण, कंपनी मालक व कामगार संघटना यांच्या करिता कार्यशाळेचे आयोजन करण्याची मागणी


संघर्ष श्रमजीवी जनरल कामगार संघटनेतर्फे कामगार उपायुक्त यांना निवेदन

औरंगाबाद : औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगार आणि मालक वर्ग यांच्यामध्ये एक वेगळे वातावरण तयार झाले आहे या मागचे कारण की मागील काही दिवसांमध्ये काही मालक वर्ग व कामगार वर्गावरती हल्ले, मारहाण झाली आहे या कारणास्तव मालक वर्गाने सर्व कामगार संघटनांना दोषी ठरवण्याचे धोरण अवलंबिले आहे.

     यामध्ये मालक वर्गांचे म्हणणे आहे की, कामगार संघटना हे मालक वर्गावर दमदाटी, दडपशाही, व गुंडागर्दी, करून हकनाक त्रास देत आहे यासाठी आम्ही फार हतबल झालेलो आहोत तसेच दुसरीकडे कामगारांचे आणि कामगार संघटनांचे म्हणणे आहे की मालक वर्ग हे शासनाच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता कामगारांवर अन्याय करत आहे. 

      यामुळे कामगार, कामगार संघटना, मालक ,यांच्यामध्ये एक प्रकारे दुरावा निर्माण होत असून, हा दुरावा भविष्यासाठी हानिकारक ठरणार आहे याकरिता संघर्ष श्रमजीवी जनरल कामगार संघटनेने निवेदनाद्वारे  कामगार उपायुक्तांना निवेदन देऊन मागणी केली आहे की आपण शासन स्तरावर एक कार्यशाळा घेऊन मालक वर्गासाठी ,तसेच कामगार, कामगार संघटनेसाठी, शासनाची काय नियमावली आहे यामध्ये असंघटित क्षेत्रासाठी काय नियम आहेत, माथाडी कामगारांसाठी काय नियम आहेत, सुरक्षा रक्षकांसाठी काय नियम आहेत, याबाबतची सर्व माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून देण्यात यावी तसेच ही माहिती देत असताना पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा आमंत्रित करावे कारण की यामध्ये पोलीस प्रशासनाची ही फार मोठी जबाबदारी असते.

      कामगार कार्यालयामार्फत शासनाच्या नियमावलीची माहिती सर्व समक्ष सांगण्यात आली तर मालक आणि कामगारांमधील वाद संपुष्टात येऊन एक चांगले खेळीमेळीचे वातावरण तयार होऊन प्रत्येकाला आपापली जबाबदारी व कायदा कळेल या प्रकारचे निवेदन कामगार उपायुक्त यांना देऊन लवकरच कार्यशाळेचे आयोजन करावे अशी विनंती संघर्ष श्रमजीवी कामगार संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गायकवाड व सचिव सुधीर खैरे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.