विविध मागण्यासाठी ओरीयन सिक्युरिटी सोल्युशन प्रा.लि.पुणे येथे होणार कामगारांचे आंदोलन

महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशन चे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिली माहिती

पुणे : ओरीयन सिक्युरिटी सोल्युशन प्रा.लि.पुणे (Orion Security Solutions Pvt Ltd) या कंपनीकडे नोकरी करत असलेल्या पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील IDEA , ATC कंपनीच्या मोबाईल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्ड (केरटेकर), टेक्निशियन (पेट्रोलर) या एकूण २८२ कामगारांना ओरीयन कंपनीने नोकरीवरून काढून टाकले असून तसेच कामगारांचा पगार , PF व इतर सर्व प्रकारची कायदेशीर देणी देण्याचे कंपनीने थकवलेली आहेत.

     ओरीयन कंपनीकडे बाकी असलेली थकीत देणी मिळावी व नोकरीबाबत सदर कामगार  कंपनीच्या पुणे येथील ऑफिस मधील अधिकाऱ्यांना विचारणा करण्यास गेले असता , कंपनीच्या अधिकाऱ्याकडून कामगारांना सांगितले जात आहे की आमच्या कंपनीचे डायरेक्टर दिल्लीला असतात, सर्व काही त्यांच्या हातात आहे ते आल्यानंतर पाहू  आम्ही काही करू शकत नाही अशी उडवाउडवीची उत्तरे देउन मागील एक वर्षापासून अधिकाऱ्यांकडून कामगारांची दिशाभूल करून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे.

  यातील प्रत्येक कामगार आपले काम व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यामधून १०० ते २०० किलोमीटरवरून येऊन प्रत्येक वेळेस पुणे येथील ऑफिसमध्ये जाऊन माघारी गेलेले आहेत. संघटनेने सुध्दा पुणे, दिल्ली येथील कंपनीच्या व्यवस्थापनाची अनेकवेळा पाठपुरावा केलेला आहे परंतु कंपनी व्यवस्थापनाणे त्याची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दाखल घेतलेली नाही किवा त्यांना त्याचा काहीही फरक पडलेला नाही . कोरोना महामारी व लॉकडाउनच्या परीस्थितीमुळे कामगारांना अनेक आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत असून त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे ते तणावाखाली जीवन जगत असून त्यांची मानसिक स्थिती ढासळलेली आहे .

तरी याबाबत सर्व कामगार ओरीयन सिक्युरिटी सोल्युशन प्रा.लि.पुणे येथे दि.३१ जुलै २०२१ रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशन चे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी दिली.