शुक्रवार दिनांक २३ जुलै २०२१ महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त असंघटीत क्षेत्रातील घरेलु व बांधकाम, रिक्षा चालक, वरील कामगारांच्यासाठी २३ जुलै २०१९ ते २३ जुलै २०२१ या वर्षात संघटनेने केलेल्या कामाचा "लेखा जोखा" प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत कोविड कालावधीत घरेलू कामगारांना, बांधकाम कामगार क्षेत्रातील कामगारांना थकीत वेतन, आरोग्य सुविधा, सरकारव्दारे मदतीकरता केलेल्या आंदोलन, मा.मुख्य मंत्री, मा. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री मा.कामगार मंत्री यांच्या कडे केलेला पाठपुरावा, झालेले शासन निर्णय, अमंलबजावणी बाबतीत अहवालची माहिती श्री शरद पंडीत यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री.विश्वकर्मा प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी संघटनेने असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्यासाठी केलेल्या कार्य अहवालाचे प्रकाशन श्री समर्थ मंडळ अध्यक्ष श्री.भगवानराव देशपांडे, कामगार नेते श्री.नितीन पवार, श्री.सतीशजी चिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष सौ.मिना पंडित, सौ.स्मिता कोरडे, प्रदेश चिटणीस सुवर्णा कोंढाळकर, पुणे जिल्हा अध्यक्ष सौ.उषा जाधव, प्रदेश सरचिटणीस श्री शरद पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कामगार नेते श्री.नितीन पवार यांनी संघटनेच्या कार्यकर्त्याच्या कामाचे कौतुक केले आणि संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री भगवानराव देशपांडे यांनी संघटनेच्या माध्यमातून या क्षेत्रातील कामगारांच्या प्रश्नाची सोडवणूक साठी करीत असलेल्या कामाचे कौतुक केले व श्री.समर्थ मंडळ कायम संघटनेच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. श्री. सतीशजी चिटणीस यांनी संघटनेच्या वर्धापदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. शरद पंडित यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
संघटनेने आयोजित केलेले चित्रप्रदर्शन पहाण्याकरीता व वर्धापदिना निमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ श्री.सुरेश भालेराव, श्री.राजाभाऊ मोरे, श्री.दिलीप पंडित, श्री.अरुण व्होरांबळे, श्री.अमित कांक अध्यक्ष भा.ज. युवामोर्चा कसबा, मा.श्री.प्रदीप इथापे संस्थापक आदर्श पुणेकर संघटना, प्रदेश, जिल्हा पदाधिकारी व प्रमुख भाग कार्यकर्त्याच्या कामाचे शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनव्दारे मिळत असलेल्या योजनांची माहिती मदत सर्वांना पोहोचविण्या करिता, प्रमुख कार्यकर्त्यानी ग्रामीण भागात जाऊन असंघटीत क्षेत्रातील कामगारांना जास्तीत जास्त संख्येने संघटनेचे सभासद करावे व शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. पुढील काळात महागाई विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात संघर्ष करावा लागेल असे आवाहन महाराष्ट्र असंघटीत कामगार संघटनेचे सरचिटणीस शरद पंडीत यांनी केले आहे.