कामगार कल्याण मंडळाच्या 'गंभीर स्वरूप आजार' या योजनेत "कोरोना" या आजाराचा समावेश करावा अशी मागणी

राज्य गुणवंत कामगार असोसिएशन च्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली मागणी

सध्या सर्व ठिकाणी कोरोना या जागतिक महामारी मुळे औद्योगिक क्षेत्र, कामगार क्षेत्र हवालदिल झालेले आहे. कोरोना या आजारामुळे अनेक कामगार कुटुंबियांना आर्थिक हानी होत आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यातील कामगार वर्गाच्या सर्वांगीण उन्नती व प्रगतीसाठी विविध योजना व उपक्रम आयोजित केले जातात यामध्ये गंभीर स्वरूपाचा आजार या योजनेचा देखील समावेश असून यामध्ये कोरोना या आजाराचा समावेश करावा अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशन च्या वतीने कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली अशी माहिती असोसिएशन चे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी दिली.

सुरेश केसरकर म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोरोना या आजाराने ग्रस्त जनतेला पूर्णतः सहकार्याचे धोरण अवलंबून सर्वतोपरी मदत देखील करीत आहे ही नक्कीच राज्यातील जनतेला दिलासा देणारी व चांगली बाब आहेत. पण महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने मंडळाचे संचालक मंडळ अस्तित्वात नाही त्यामुळे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही या एकमेव कारणास्तव राज्यातील कोरोना ग्रस्त पात्र कामगार व त्यांच्या कुटुंबियांना या योजनेतून लाभ घेण्याचे धोरण स्वीकारले नसून अर्ज केलेल्या सर्व कामगारांचे सर्व अर्ज प्रलंबित ठेवलेले आहेत.

     कामगार कल्याण मंडळाचे संचालक मंडळ अस्तित्वात नसले तरी या एकमेव कारणास्तव मंडळाचे कोणतेही कामकाज ठप्प झालेले ऐकवीत नाही तरी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या गंभीर स्वरूपाचा आजार या योजनेत कोरोना या आजाराचा समावेश करावा अशी मागणी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे करण्यात आली अशी माहिती केसरकर यांनी दिली.