मृत वीज कंत्राटी कामगाराला १० लाखाचा विमा

कोरोना काळात वीज सेवा अत्यावश्यक होती. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात तब्बल ४० कंत्राटी कामगारांचा मृत्यू  झाला होता. अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन कोणतीच जबाबदारी घेत नाही, नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ होते, त्या मुळे संबंधित कुटुंब उघड्यावर पडते. शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत या कामगारांना न दिल्याने कामगाराच्या कुटुंबाची आर्थिक हेळसांड झाली. 

याकरिता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पुढाकार घेऊन संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा.अण्णाजी देसाई यांच्या संकल्पनेतून दि.१ जुलै २०२० रोजी वेलफेअर फंडांची स्थापना केली व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी च्या सहकार्याने संघटनेच्या सदस्यांसाठी १० लाख रुपयांची अपघात विमा योजना सुरू केली.

दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी  संगमनेर तालुक्यातील सोपान भाऊका कुलाळ यांचे घारगाव शाखेतील कर्जुले पठार येथील वीज उपकेंद्रात अपघाती निधन झाले होते. त्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला होता त्या मुळे त्या कामगारांची पत्नी श्रीमती प्रियंका कुलाळ यांना (दि.१५ एप्रिल २०२१) महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ वेल्फेअर फंडांच्या वतीने १० लाखाचा अपघात विम्याचा चेक देण्यात आला.

या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री राहुल बोडके, शरद मते, रामदास खराडे, सागर अहिनवे उपस्थित होते. ओरिएंटल इन्शुरन्स च्या शाखा प्रमुख सुनीता भुरेवार व विजय अहिवळे यांचे  तसेंच महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात , कोषाध्यक्ष सागर पवार,  कार्याध्यक्ष उमेश आणेराव यांचे मोलाचे  सहकार्य लाभले.