मुंबई येथे राष्ट्रवादी कामगार सेल ची बैठक संपन्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१९ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात कामगार सेलची आढावा बैठक संपन्न झाली. कामगार सेलचे राज्यप्रमुख शिवाजीराव खटकाळे यांच्या पुढाकाराने ही बैठक पार पडली. यावेळी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मते मांडली.
"कामगार विभाग मजबूत व्हायला हवा, असे पवार साहेबांचे धोरण आहे. त्यासाठी पक्षाची कामगार संघटना स्थापन करावी." अशी मागणी कामगार सेल प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी केली. "श्रमाला प्रतिष्ठा आणि घामाला दाम मिळवून देण्याचं काम आपण केल्यास आपल्या पक्षाकडून कामगारांना न्याय मिळेल", असा विश्वास खटकाळे यांनी व्यक्त केला.
"केंद्र कृषी कायद्यांविरोधात दिल्लीला पडलेला शेतकऱ्यांचा वेढा संपल्यावर कामगारांचा वेढा पडू शकेल, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कामगारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव रस्त्यावर येण्याची भूमिका घेतो. कामगार हितांना बाधा आणण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. हे कामगार सेलच्या माध्यमातून आपण जनतेला पटवून देण्याचं काम करायला हवं", असे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यावेळी म्हणाले.
सेलच्या माध्यमातून केलेल्या मागणीप्रमाणे पक्षाची कामगार संघटना स्थापन करावी अथवा फेडरेशन करायचं की ॲफिलिएशन करायचं ? याकरिता सेलच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अधिक माहिती घ्यावी त्यानंतर यावर पक्षाच्या ज्येष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी यावेळी व्यक्त केला.
"पक्षाचा कामगार सेल मधील कार्यकर्ते खटकाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात. कामगार म्हणजे केवळ कारखान्यात काम करणारे कामगार नसून यात संघटित, असंघटित, शेती, ऊसतोड, माथाडी असे असंख्य कामगार येतात. या सगळ्यांसाठी कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी एक भक्कम स्वरूप देणे गरजेचे असल्याचे कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडून ज्या संहिता मंजूर करण्यात आल्या त्यावेळी केंद्राने कोणालाच विश्वासात घेतले नाही. जसे कृषी कायदे केले तसेच कामगारांसाठी कायदे केले आहेत. हे कायदे येणाऱ्या १ एप्रिलपासून अंमलात येतील. यात कामगारांना जास्तीत जास्त कमजोर करण्याचं काम केंद्राने केलं आहे. अशी टीकाही ना.दिलीप वळसे पाटील यांनी केंद्र सरकारवर केली.
या आढावा बैठकीत अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच कामगार सेलचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.