तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीत भीषण स्फोट; तीन कामगार जखमी

पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील तारापूर एमआयडीसी परिसरातील विराज प्रोफाइल कंपनीच्या एसएमएस-1 प्लांटमध्ये सोमवारी सकाळी अचानक जोरदार स्फोट झाल्याने तीन कामगार जखमी झाले. या घटनेनंतर कंपनीत एकच गोंधळ उडाला आणि कामगार बाहेर पळू लागले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे.

    या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनीत सकाळच्या पहिल्या शिफ्टचे काम सुरू झाल्यानंतर काही वेळातच फर्नेस टँकमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर कंपनीत आग लागली. कारखान्यात सुमारे 100 ते 150 कामगार उपस्थित होते. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून कर्मचारी आणि आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, काही कामगार घटनास्थळी अडकले असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक मदत व बचावकार्य करत असून आग विझवण्याचे कामही सुरू आहे. सध्या स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही. पोलीस आणि संबंधित प्रशासन या प्रकरणाचा तपास करत आहेत.

   स्थानिक नागरिकांनी सांगितले की, सोमवारी सकाळी विराज कंपनीत सलग तीन वेळा जोरदार स्फोट झाल्याने परिसरात खळबळ उडाली. स्फोट इतके शक्तिशाली होते की, आसपासचा परिसर हादरून गेला. कारखान्यात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी पत्र्यांचे तुकडे दूरवर जाऊन पडले, तर सिक्युरिटी गार्डच्या केबिनच्या काचाही फुटल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत तीन कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.