महिंद्रा स्टील सर्व्हिस सेंटर लि. कान्हे-मावळ व भारतीय कामगार सेना यांच्यात ८ वा ऐतिहासिक वेतन करार संपन्न

४१ कामगारांना लाभ, ₹१६,३७५ पर्यंत भरघोस पगारवाढ - डीजे, फटाके, मिरवणुकीत उत्साहात स्वाक्षरी सोहळा!

कान्हे, मावळ - महिंद्रा स्टील सर्व्हिस सेंटर लिमिटेड, कान्हे (मावळ) आणि भारतीय कामगार सेना यांच्यामध्ये ८ वा ऐतिहासिक वेतन करार मोठ्या जल्लोषात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. कामगारांनी फटाके व डीजे लावून मान्यवरांची भव्य मिरवणूक काढली. गणपतीची आरती झाल्यानंतर स्वाक्षरी सोहळा पार पडला.

     या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री दर्जा, किमान वेतन आयोग, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तथा शिवसेनेचे उपनेते मा. डॉ. रघुनाथ कुचिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत सहचिटणीस श्री. शुभम दिघे, कार्यकारिणी सदस्य श्री. अनिल जगताप, सी.आय.ई. युनियन अध्यक्ष श्री. रामदासजी सातकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कराराची ठळक वैशिष्ट्ये :

१. लाभार्थी कामगार: या कराराचा लाभ एकूण ४१ कामगारांना झाला आहे.

२. भरघोस वेतनवाढ:

- १० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या कामगारांना - ₹१६,३७५/- वाढ

- १० वर्षांखालील अनुभव असलेल्या कामगारांना - ₹१२,८७५/- वाढ

३. करार कालावधी: मागील करार ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला. नवीन करार दि. १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२८ असा ३ वर्षांसाठी लागू असेल.

४. मेडिक्लेम वाढ: मेडिक्लेम पूर्वी ₹१,५०,००० होता, तो आता ₹५०,००० ने वाढवून ₹२,००,००० करण्यात आला आहे.

५. अपघात विमा (नवीन): यापूर्वी नसलेला ₹५ लाखांचा अपघात विमा नव्याने सुरू करण्यात आला आहे.

६. मृत्यू निधी (नवीन): यापूर्वी मृत्यू निधी नव्हता. आता कंपनीकडून ₹२,५०,००० + कामगारांचा एक दिवसाचा पगार असा मृत्यू निधी सुरू करण्यात आला आहे.

७. हजेरी भत्ता वाढ: हजेरी भत्त्यामध्ये ५०% ने वाढ करण्यात आली आहे.

मान्यवरांचे मार्गदर्शन:

व्यवस्थापनाकडून महिंद्रा ॲसेलो कान्हे, भोपाळ, बडोदा प्लांटचे बिझनेस हेड श्री. लक्ष्मणजी महाले, प्लांट चीफ श्री. निवास गांधले, आय.आर. व ॲडमिन हेड श्री. दादाराम मेहेत्रे, आय.आर. मॅनेजर श्री. सूर्यकांत महामुनी, डेप्युटी चीफ श्री. वैभव चव्हाण उपस्थित होते.

महिंद्रा स्टील युनिटचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ मयेकर यांनी कराराचे वाचन केले. सचिव श्री. संपत शिंदे यांनी प्रस्तावना केली. प्रोडक्शन संदर्भात श्री. निवास गांधले यांनी, कायदा व डिसिप्लिन संदर्भात आय.आर. हेड श्री. दादाराव मेहेत्रे यांनी, तर कामगारांच्या सुरक्षितता, हेल्थ व कंपनीच्या भरभराटीचा लेखाजोखा श्री. महाले यांनी मांडला.

प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. रघुनाथ कुचिक म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘कंपनी जगली तर कामगार जगेन’ या उक्तीप्रमाणे सर्वांनी काम केले पाहिजे. मॅनेजमेंट व कामगार यांनी संयम व विश्वास यातून हा करार यशस्वी झाला आहे. कामगार कायदे आणि पुढील आव्हाने यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आतिश रावळे यांनी केले. शेवटी युनिट उपाध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य श्री. सुनील मराठे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी महिंद्रा अँड महिंद्रा स्पेअरच्या सी.आय.ई. कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.