रायगड : महाड एमआयडीसीमध्ये अनपेक्षित आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसीमधील एका कंपनीत गॅस गळती झाल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तसेच 36 कामगार बाधित झाल्याची घटना घडली आहे असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स वृत्तसंस्थेने दिले आहे.
इतक्या मोठ्या कंपनीत गॅस गळतीची घटना नेमकी कशामुळे झाली? कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. गॅस गळतीमागे नेमकं काय कारण आहे? या प्रकरणात कोण दोषी आहे? असे देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी रुग्णवाहिकादेखील रवाना झाल्या होत्या. बचावकार्य युद्ध पातळीवर करण्यात आल्याची माहिती आहे.
महाडऔद्योगिक वसाहतीतील इंडो अमाईन्स कंपनीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या गॅस गळतीमुळे कंपनीतील तब्बल ३६ कामगार बाधित झाले आहेत. त्यापैकी अमित कुमार (वय २८, मूळ रा. बिहार) आणि कल्पेश वांद्रे या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असून काही कामगारांवर महाड आणि मुंबई येथे उपचार सुरू आहेत.
इंडो अमाईन्स कंपनीतील प्लांटजवळ हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या गॅसची गळती झाल्याचे सांगण्यात येत आहे. गॅसगळतीचा परिणाम कंपनीतील कामगारांबरोबरच परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही जाणवला. गॅसमुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
काहींची प्रकृती गंभीर
गॅसची बाधा झालेल्या ३६ कामगारांना तातडीने औद्योगिक वसाहतीतील एमएमए रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना महाडमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन कामगारांना पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत अमित कुमार यांचा मृत्यू झाल्यानंतर कल्पेश वांद्रे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. एका कामगाराची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
गॅस गळतीचे कारण काय?
घटनेची माहिती मिळताच फॅक्टरी इन्स्पेक्टर तांबोळी आणि महाडचे प्रभारी डीवायएसपी शशिकांत पवार यांनी सकाळी दहा वाजता कंपनीला भेट दिली. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून दुर्घटनेची माहिती घेतली. महाड औद्योगिक वसाहतीचे अधिकारीही घटनेचा तपास करीत असून, गॅसगळतीचे नेमके कारण आणि सुरक्षाव्यवस्थेतील संभाव्य त्रुटी याबाबत चौकशी सुरू आहे.

