पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद योगदान देणाऱ्या राज्यातील गुणवंत कर्मचाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चाकण औद्योगिक वसाहतीमधील प्रसिद्ध 'लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीमधील ऑपरेटर, तसेच कामगार चळवळीतील आघाडीचे नेतृत्व श्री. अविनाश वाल्मिक वाडेकर यांना सन २०२४ चा अत्यंत मानाचा 'विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार' जाहीर झाला आहे.
कामगार क्षेत्रात अष्टपैलू योगदान, औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कामगारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. श्री. अविनाश वाडेकर हे 'लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन'चे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, कामगारांच्या हक्कांसाठी ते नेहमीच तत्पर असतात. यासोबतच 'राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघा'चे सचिव म्हणूनही ते मोठी जबाबदारी सांभाळत असून, कामगार चळवळीत त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे.
पुरस्काराचे स्वरूपया उल्लेखनीय बहुमानाबद्दल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून श्री. वाडेकर यांना रोख रक्कम रु. २५,०००/-, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपूर्वक प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.चाकण औद्योगिक क्षेत्रात आनंदाचे वातावरणश्री. अविनाश वाडेकर यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगार वर्गात आणि युनियनच्या वर्तुळात प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल लॉरियाल इंडिया कंपनीचे व्यवस्थापन, कारखान्यातील सर्व सहकारी, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे सभासद आणि चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध कामगार संघटनांकडून त्यांच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

