ट्रिनिटी इंडिया फोर्जटेक प्रा. लि. मधील कामगारांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

शिक्रापूर (ता. शिरुर) : येथील ट्रिनीटी इंडिया फोर्जटेक प्रायवेट लिमिटेडच्या कामगारांनी वेतनवाढ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवगर्जना कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या गेटवर बेमुदत संप सुरु केला आहे. शिक्रापूर येथील ट्रिनीटी इंडिया फोर्जटेक प्रा. लिमिटेडच्या कामगारांनी कामगारांच्या वेतनवाढ बाबतचे निवेदन कंपनी व्यवस्थापकांना दिले होते.

    कंपनीकडून कामगारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने कामगारांनी वेतनवाढ व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवगर्जना कामगार संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या गेटवर बेमुदत संप सुरु केले. यावेळी ८३ कामगार हातात भगवे व काळे झेंडे घेऊन शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या गेटवर बेमुदत संपावर बसले आहेत.

कामगारांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

  • सन्मानजनक वेतनवाढ करार करणे.
  • महागाईच्या वाढत्या दरानुसार वेतनात सुधारणा करणे.
  • कंत्राटी व कायम कामगारांमध्ये समानतेचे धोरण राबविणे.
  • कामगारांना कायदेशीर सुविधा व हक्क प्रदान करणे.
  • सुरक्षित व आरोग्यदायी कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे.

     संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे यांनी सांगितले की, "कामगारांच्या न्याय्य व कायदेशीर मागण्यांसाठी आम्ही सातत्याने व्यवस्थापनाशी संवाद साधला. मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कामगारांनी लोकशाही मार्गाने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापनाने तातडीने चर्चेसाठी पुढे यावे व कामगारांच्या प्रश्नांवर न्याय्य तोडगा काढावा."

   संघटनेने स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत वेतनवाढ करार व इतर प्रलंबित मागण्यांबाबत समाधानकारक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील. तसेच कामगार आयुक्त कार्यालयामार्फत सुरू असलेल्या समेट प्रक्रियेतही संघटना सक्रियपणे सहभागी राहणार असून कायद्याच्या चौकटीत राहून लढा सुरू ठेवणार आहे.