मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई सेंट्रल येथील 'वाहतूक भवन' या महामंडळाच्या मुख्यालयात गुरुवार, दि.११ जून रोजी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले. या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
