वरिष्ठ सरव्यवस्थापक एच आर (ग्रावर अँड वेल (इंडिया) लिमिटेड)
भारतातील कामगार कायदे अनेक दशकांपासून विविध कायद्यांच्या चौकटीत कार्यरत होते. वेतन, बोनस, किमान वेतन आणि समान वेतन यांसाठी स्वतंत्र कायदे अस्तित्वात होते. मात्र बदलत्या औद्योगिक संरचनेनुसार या कायद्यांचे आधुनिकीकरण आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने The Code on Wages, २०१९ लागू केला.
हा वेज कोड म्हणजे केवळ कायद्यांचे एकत्रीकरण नाही, तर वेतन व्यवस्थेतील एक संरचनात्मक बदल आहे. यामुळे उद्योग, कर्मचारी आणि HR व्यवस्थापन या तिन्ही घटकांवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
वेज कोडची गरज का भासली ?
Payment of Wages Act, 1936
Minimum Wages Act, 1948
Payment of Bonus Act, 1965
Equal Remuneration Act, 1976
या कायद्यांमधील व्याख्या, अंमलबजावणी आणि पात्रता निकष वेगवेगळे होते. परिणामी उद्योगांसाठी अनुपालन (compliance) गुंतागुंतीचे बनले होते. वेज कोडने या सर्व कायद्यांचे एकत्रीकरण करून एकसंध आणि स्पष्ट कायदेशीर चौकट निर्माण केली आहे.
वेज कोडमधील महत्त्वाचे बदल :
१. वेतन या संकल्पनेची एकसंध व्याख्या - वेज कोडमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे वेतनाची एकसंध व्याख्या. मूलभूत वेतन (Basic) आणि महागाई भत्ता (DA) हे मिळून एकूण वेतनाच्या किमान ५०% असणे आवश्यक आहे. यामुळे उद्योगांना त्यांच्या उढउ रचनेत बदल करणे भाग पडेल. विशेषतः ज्या कंपन्यांमध्ये भत्त्यांचे प्रमाण जास्त होते, त्यांना आता वेतन संरचना पुनर्रचित करावी लागेल.
२. राष्ट्रीय किमान वेतन (National Floor Wage) - केंद्र सरकार राष्ट्रीय किमान वेतन निश्चित करेल आणि कोणत्याही राज्य सरकारला त्यापेक्षा कमी वेतन निश्चित करता येणार नाही. यामुळे देशभरातील किमान वेतन प्रणालीत सुसंगतता येईल. विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना याचा फायदा होईल.
३. समान कामासाठी समान वेतन - लिंगभेद न करता समान कामासाठी समान वेतन देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे पाऊल सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
४. बोनससंदर्भातील स्पष्टता : बोनस पात्रतेसाठी वेतन मर्यादा आणि किमान बोनस दर स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बोनस अंमलबजावणीत पारदर्शकता वाढेल.
उद्योग क्षेत्रावर परिणाम - वेज कोड लागू झाल्यानंतर उद्योगांना खालील बदल करावे लागतील :
- वेतन संरचना पुनर्रचना
- Payroll प्रणालीत सुधारणा
- PF व Gratuity देयकांमध्ये वाढ
- HR धोरणे अद्ययावत करणे
- Compliance व्यवस्थापन अधिक मजबूत करणे
विशेषतः उत्पादन (Manufacturing) क्षेत्रात कामगार खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्यांनी आर्थिक नियोजन आणि बजेटिंगमध्ये योग्य तरतूद करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांवर परिणाम
कर्मचार्यांच्या दृष्टीने वेज कोडमुळे :
- दीर्घकालीन फायदे (PF, Gratuity वाढ)
- वेतन संरचनेतील पारदर्शकता
- समानतेचा सिद्धांत बळकट
मात्र काही प्रकरणांमध्ये हातात मिळणारे वेतन (Take Home Salary) कमी होण्याची शक्यता आहे, कारण योगदान वाढेल. त्यामुळे HR विभागाने याबाबत स्पष्ट संवाद साधणे अत्यावश्यक आहे.
HR व्यवस्थापनासाठी वेज कोड हा एक आव्हानात्मक पण सकारात्मक बदल आहे. हा केवळ अनुपालनाचा विषय नसून, तो धोरणात्मक नियोजनाचा विषय आहे.
HR विभागाने खालील पावले उचलावीत :
- विद्यमान वेतन संरचनेचे सखोल विश्लेषण
- कायदेशीर अनुपालन ऑडिट
- व्यवस्थापनाला आर्थिक परिणामांचे सादरीकरण
- कर्मचार्यांशी पारदर्शक संवाद
- ERP व Payroll प्रणाली अद्ययावत करणे
HR ला आता "Administrative Function" पासून "Strategic Business Partner" या भूमिकेकडे अधिक सक्रियपणे वाटचाल करावी लागेल.
(सदर लेख 'कामगार नामा मॅगझीन' मध्ये प्रसिद्ध झाला आहे)

