कुवैतमध्ये अडकलेल्या ३०० भारतीय कामगारांच्या स्वदेशी परतीचा मार्ग मोकळा

कुवैत : खाडी देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुवैतमध्ये अडकलेल्या सुमारे ३०० भारतीय कामगारांसाठी दिलासाणदायक बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (भारतीय मजदूर संघ संलग्न) यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारत सरकार व भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपातून या कामगारांच्या सुरक्षित स्वदेश परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रकरण काय होते?

    कुवैतमधील एका कंपनीने दिनांक १० ते २४ फेब्रुवारीदरम्यान सुमारे ३०० कामगारांना सेवामुक्त केले होते. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी विमानतळ बंद झाल्यामुळे हे सर्व कामगार कुवैतमध्येच अडकून पडले. वेतन बंद होणे व अनिश्चिततेमुळे त्यांच्या मानसिक व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला होता.

    संघटनेची भूमिका व कार्यवाही या गंभीर परिस्थितीची माहिती संघटनेचे कार्यकर्ते श्री. कालूराम गर्ग (जे स्वतः कुवैतमध्ये अडकले होते) यांच्या माध्यमातून अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघापर्यंत पोहोचली. त्यानंतर महासंघाकडून सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी तातडीने पंतप्रधान मा.ना  श्री. नरेंद्र मोदी व  मा मनसुख मांडवीय श्रम मंत्री  यांना पत्र पाठवून भारतीय दूतावासामार्फत त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती . 

सद्यस्थिती : ४८ कामगारांचा पहिला ताफा रवाना

महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे दिनांक २८ मार्च रोजी संबंधित कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. उपलब्ध माहितीनुसार: पहिल्या टप्प्यातील ४८ कामगारांना भारतीय दूतावासाकडून परतीस मंजुरी मिळाली आहे. हे कामगार पुढील एक आठवड्यात सौदी अरेबियामार्गे भारताकडे रवाना होणार आहेत. उर्वरित कामगारांना त्यांच्या सेवामुक्ती दिनांक व व्हिसा प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने भारतात पाठविण्यात येणार आहे.

    कंपनीने सर्व कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, ही बातमी समजताच अडकलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाने या तात्काळ कार्यवाहीबद्दल भारत सरकार व भारतीय दूतावासाचे आभार व्यक्त केले आहेत. आखातातील कामगारांनी मनोधैर्य कायम ठेवून दूतावास ची संर्पक ठेवावा  तसेच या बाबतीत अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) आखातातील भारतीय  कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील आहे, असे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे .