औद्योगिक शांततेसाठी उद्योग-कामगार समन्वयात सातत्य गरजेचे

निमा आणि भाजप कामगार मोर्चाच्या बैठकीत सूर

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणे आवश्यक असल्याचा सूर आज नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) आणि भाजप कामगार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उमटला. ही बैठक 'निमा हाऊस' येथे उत्साहात पार पडल असे वृत्त हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेने दिले आहे.

    या बैठकीत नाशिकमध्ये झालेली मोठी औद्योगिक गुंतवणूक, कामगारांच्या विविध समस्या तसेच आगामी काळातील कौशल्य विकास उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    यावेळी बोलताना निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी नाशिकच्या औद्योगिक प्रगतीचा आढावा मांडला. ते म्हणाले की, "निमाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नाशिकमध्ये सुमारे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. कै. पद्मश्री बाबुभाई राठी यांच्या काळापासून निमाची जी गौरवशाली परंपरा आहे, तीच परंपरा पुढे नेत आम्ही नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी अधिक प्रभावीपणे कार्यरत राहू."

    भाजपचे कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश नानासाहेब मोरे यांनी कामगार आणि उद्योजक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की आम्ही आक्रमक युनियनऐवजी कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वाद सामोपचाराने सोडवण्यावर भर दिला आहे. कामगार मोर्चाच्या माध्यमातून आगामी काळात आदर्श कार्यपद्धती राबविण्यात येईल."

   भाजप कामगार मोर्चाचे शहराध्यक्ष हेमंत नेहेते यांनी यावेळी युनियनच्या नावाखाली होणाऱ्या शोषणावर टीका करत, "समन्वयातून प्रश्न सुटत असतील तर विनाकारण युनियनचा अट्टाहास करण्याची गरज नाही. सरकार आणि निमाच्या माध्यमातून थेट कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू," असे सांगितले.

    निमा स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंट समितीचे अध्यक्ष तसेच भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार श्रीकांत पाटील यांनी कौशल्य विकासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, "औद्योगिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या पण औपचारिक शिक्षण कमी असलेल्या कामगारांसाठी लवकरच 'NSDC'च्या माध्यमातून एक नवीन कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे."

    निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे यांनी आभार मानले व निमाच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देताना सांगितले की, निमा ही संस्था केवळ उद्योजकांसाठीच नव्हे तर कामगारांच्या सर्वांगीण कल्याणासाठीही सातत्याने कार्यरत आहे.

    या बैठकीला निमा अध्यक्ष आशिष नहार, सरचिटणीस राजेंद्र अहिरे, खजिनदार राजेंद्र वडनेरे, स्टार्टअप कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सुधीर बडगुजर, हेमंत खोंड, किरण वाजे, मंगेश गांधी, गोविंद बोरसे, दिलीप पिंगळे यांच्यासह निमाचे कार्यकारिणी सदस्य तसेच भाजप कामगार मोर्चाचे अध्यक्ष हेमंत नेहेते, व्यंकटेश मोरे आणि औद्योगिक व कामगार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    बैठकीत उपस्थित मान्यवरांनी निमाच्या कार्याचे कौतुक करत नाशिकच्या औद्योगिक हितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.