नागपूरच्या इएसआयसी (ESIC) वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : नागपूर येथील कामगारांसाठी प्रस्तावित असलेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. राज्य शासनामार्फत याबाबत उचलत असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत ( दि.९) दिली. नागपूरच्या कामगार रुग्णालयात पडून असलेल्या ५० वैद्यकीय उपकरणांच्या (मशिन्स) प्रकरणाची आज चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेशही श्री. आबिटकर यांनी दिले.

    प्रश्नोत्तराच्या तासात आमदार प्रवीण दटके यांनी नागपूरच्या इएसआयसी मेडिकल कॉलेजचा प्रश्न उपस्थित केला होता.

    आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, नागपुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत शासन पूर्ण सकारात्मक आहे. २०२० मध्ये राज्य कामगार विमा योजनेत जे बदल झाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, डेप्युटेशन आणि निवृत्ती वेतन याबाबत काही कायदेशीर व तांत्रिक गुंते निर्माण झाले होते. या तांत्रिक बाबींमध्ये दुरुस्ती करून नवीन सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी विनंती केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच तत्काळ संमती दिली जाईल.

    नागपूरच्या रुग्णालयात यंत्रसामुग्री धूळ खात पडून असल्याच्या मुद्द्यावर मंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. शासकीय निधीतून घेतलेली यंत्रसामग्री जर वापरली जात नसेल, तर या प्रकरणाची आजच्या आज चौकशी लावली जाईल आणि जे अधिकारी किंवा कर्मचारी यात दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    राज्यातील इएसआयसी रुग्णालयांच्या सद्यस्थितीवर आरोग्यमंत्री प्रकाश  आबिटकर म्हणाले की, नवीन डायलिसिस युनिट्स, एनआयसीयू (NICU) आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स सुरू करण्यात येत आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजना ही आता सर्व कामगार रुग्णालयांमध्ये ही योजना अनिवार्य करण्यात आली आहे, जेणेकरून केवळ कामगारांनाच नव्हे, तर सामान्य जनतेलाही या सुविधांचा लाभ मिळेल.

या प्रश्नांच्या चर्चेत विधानसभा सदस्य विकास ठाकरे यांनी सहभाग घेतला.