एनटीसी मिल कामगारांच्या वेतनासाठी भूमिका घेणार, कामगार मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबतचा प्रश्न केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. तथापि राज्य शासन या प्रकरणात सक्रीय भूमिका घेईल, असे कामगारमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत सांगितले. मुंबईतील एनटीसी मिलमधील कामगारांना थकीत वेतन अदा करण्याबाबत काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

     कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी सांगितले की, कामगारांवर अन्याय होऊ नये, त्यांच्या थकीत वेतनासह सर्व देणी वेळेत मिळावीत यासाठी केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने कार्य करीत आहे. आवश्यकतेनुसार मंत्रालयात बैठक घेऊन अशा सर्व प्रकरणांवर निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले. केंद्र शासनाच्या कामगार विभागाचे उपमुख्य आयुक्त यांच्या स्तरावर राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मॅनेजमेंट यांच्यात तडजोडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सुनावण्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, त्या माध्यमातून लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचे कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी यावेळी नमूद केले. या चर्चेत भाजपचे आमदार संजय केळकर आणि शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी सहभाग घेतला.