पुणे : भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाचे ६ वे त्रैवार्षिक अधिवेशन रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९ .०० वा. महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.एस. मल्लेशम ( अखिल भारतीय अध्यक्ष, भारतीय मजदूर संघ ) मा.मेधा कुलकर्णी (खासदार, राज्यसभा) मा.राजेंद्र पवार ( संचालक महावितरण ), अनिल ढुमणे (अध्यक्ष, महाराष्ट्र), किरण मिलगीर (महामंत्री, महाराष्ट्र), सी. व्ही. राजेश (क्षेत्रीय संगठन सचिव) बाळासाहेब भुजबळ (संघटन सचिव) तसेच अण्णासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या अधिवेशनात राज्यातील वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येणार असून संघटन बळकटीकरण व भावी दिशा निश्चित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच पाच महत्त्वपूर्ण ठराव अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहेत.
1) हरियाणा पॅटर्न नुसार कंत्राटदार विरहित व वयाच्या 60 वर्षापर्यंत रोजगार मिळावा.
2) मा.न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन सर्व वीज कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्यावे.
3) वीज उद्योग धोकादायक असल्याने स्वतंत्र वेतन श्रेणी द्यावी
4) किमान वेतन नको जीवन वेतन द्या
5) ई.एस.आय.सी पात्रता 21 हजार वरून 42 हजार करण्यात यावी .या बाबतीत ची माहीती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगीतली आहे.
राज्यातील वीज कंत्राटी कामगारांचे हक्क, सामाजिक सुरक्षा, वेतन, सेवा स्थैर्य आदी विषयांवर संघटनेची ठाम भूमिका अधोरेखित केली जाणार आहे. राज्यातील हजारो कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनातील व्यवस्था महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ पुणे जिल्ह्या अध्यक्ष निखील टेकवडे, सचिव योगेश महांगरे , सुमीत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दहा समिती कार्यरत असून पुण्यातील 252 कार्यकर्ते सक्रिय पणे कार्यरत आहेत.

