लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत भीषण आग; चार कामगार गंभीर जखमी

हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील गुरुवार दुपारी अत्याधुनिक यंत्रमाग कारखान्याच्या आयुष कंपनीमध्ये ट्रान्स्फार्मरमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली.आग आटोक्यात आल्यानंतर पाहणी करताना पुन्हा जोराचा भडका उडाला. या घटनेत चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच आयजीएम रुग्णालय परिसरात जखमींच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती असे वृत्त तरुण भारत वृत्तसंस्थेने दिले आहे. 

    रमेश कालिया यांचा लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये अत्याधुनिक यंत्रमागा कारखाना आहे. कारखान्याच्या विद्युत ट्रान्स्फार्मरमध्येशॉर्टसर्कीटने गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. तातडीने उपाययोजना केल्याने ही आग आटोक्यात आली.मात्र काही कालावधीनंतरकारखान्यातील ४ कर्मचारी पुन्हा त्या ट्रान्रफार्मरची पाहणी करत असताना जोराचा भडका उडाला. घटनेत कारखान्यातील राऊंडर दीपक कांबळे (रुई) हे गंभीर जखमी झाले तर दिवाणजी राहुल पाटील (कोल्हापूर), रामनिवास बन्ना तसेच मेडिंगवाला अविनाश शेरेकर (माणगाव) यांना आगीच्या झळा लागल्याने जखमी झाले आहेत.

    अन्य कामगारांनी जखमींना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र चौघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवले आहे. घटनेची माहिती मिळताच जखमींचे नातेवाईक आणि कारखान्याचे मालक तसेच कर्मचायांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. दरम्यान ट्रान्स्फार्ममधील ऑईलमुळे पुन्हा आगीचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. फिर्याद आयुष इंडस्ट्रिजचे मालक आयुष कालीया यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे.