रांजणगाव व चाकण एमआयडीसीमध्ये किमान वेतन पाहणी

पुणे : महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ व राज्याच्या कामगार विभागाच्या वतीने रांजणगाव व चाकण एमआयडीसी तसेच सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात किमान वेतनाबाबत विविध कंपन्यांना भेट देऊन माहिती घेण्यात आली व चौकशी करण्यात आली.

    राज्य शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यातील शिष्टमंडळात किमान वेतन सल्लागार मंडळाचे सदस्य बाबासाहेब दरेकर, बाळासाहेब भुजबळ, रांजणगाव विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त डी. डी. पवार, चाकण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास मुजमुले, तसेच पी. बी. जाधव (सहाय्यक कामगार आयुक्त), एस. बी. माळी, एस. एस. पाटील, एस. एच. चोभे आणि डी. जी. गोटके (सरकारी कामगार अधिकारी) उपस्थित होते.

    यावेळी तिन्ही ठिकाणच्या विविध कंपन्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली. या चौकशीत काही कंपन्या कामगार कायद्याचे उल्लंघन करत असून कामगारांना मिळणे आवश्यक असलेले किमान वेतनही देत नसल्याचे आढळून आले.

    अशा सर्व कंपन्यांचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष गणेश ताठे यांनी सांगितले. तसेच मंडळाच्या वतीने कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.